आयोगाचा दणका : आधी भाजप नेत्यावर बंदी अन् नंतर त्याच्या पोलीस अधीक्षक भावाची उचलबांगडी

निवडणूक आयोगाने आधी भाजपच्या बड्या नेत्याला आणि नंतर त्याच्या पोलीस अधिकारी भावालामोठा धक्का दिला आहे.
election commission transfers himanta biswa sarma brother sushanta
election commission transfers himanta biswa sarma brother sushanta

गुवाहाटी : आसाममध्ये भाजपकडून मुख्यमंत्रिपदाचे दावेदार मानले जाणारे नेते हिमंता बिस्वा शर्मा यांना निवडणूक आयोगाने दणका दिला होता. आता त्यांचे बंधू व गोलपाराचे पोलीस अधीक्षक सुशांत बिस्वा शर्मा यांची उचलबांगडी आयोगाने केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपला हा मोठा धक्का बसला आहे. 

आसाम राज्यात तीन टप्प्यांत मतदान होत आहे. दोन टप्पे झाले असून, तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी (ता.६) होत आहे. आता मुख्यमंत्रिपदाचे दावेदार मानले जाणारे आणि भाजपचे स्टार प्रचारक हिमंत बिस्वा शर्मा यांना निवडणूक आयोगाने दणका दिला आहे. त्यांच्यावर ४८ तास प्रचार करण्यास बंदी घालण्यात आली आहे. यामुळे आता अखेरच्या टप्प्यात ते प्रचार करु शकणार नाहीत. याचा भाजपला फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

हिमंत बिस्वा शर्मा यांच्यावर कारवाई केल्यानंतर त्यांचे बंधू व पोलीस अधीक्षक सुशांत बिस्वा शर्मा यांनाही निवडणूक आयोगाने दणका दिला आहे. सुशांत यांची गोलपाराच्या पोलीस अधीक्षकपदावरुन उचलबांगडी करण्यात आली. त्यांना दुसरी योग्य नियुक्ती मिळेपर्यंत त्यांची रवानगी राज्य मुख्यालयात करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आयपीएस अधिकारी वीरा वेंकट राकेश रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गोलपारा जिल्ह्यात अखेरच्या टप्प्यात ६ एप्रिलला मतदान होत आहे. 

शर्मा यांनी काँग्रेसचा सहकारी पक्ष बोडोलँड्स पीपल्स फ्रंटचे नेते हगरामा मोहिलरी यांना धमकी दिली होती. राष्ट्रीय तपास संस्थेचा वापर करुन त्यांना तुरुंगात टाकण्याची जाहीर धमकी शर्मा यांनी दिली होती. कारवाई करण्याआधी निवडणूक आयोगाने शर्मा यांच्याकडे खुलासा मागवला होता. परंतु, त्यांचा खुलासा समाधानकारक नसल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. 

आसाममध्ये विधानसभेच्या एकूण 126 जागा आहेत. भाजपचे हिमंता शर्मा हे आसामच्या जलुकबारी मतदारसंघातून उभे आहेत. नुकतेच प्रचारावेळी ते म्हणाले होते की, गेल्या पंचवीस वर्षांपासून मी आमदार आहे. गेल्या पाच वर्षांत आसाममध्ये भाजपच्या सरकारने चांगले काम केले आहे. त्यामुळे राज्यातील 90 टक्के मतदार भाजपला मतदान करतील. यामुळे भाजप आघाडीला 90 हून अधिक जागा मिळतील. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपला 59 जागा मिळाल्या होत्या. यंदा 63 ते 66 जागा मिळतील. भाजप आघाडीला एकूण 90 पेक्षा जास्त जागा मिळतील.

हिमंता बिस्वा शर्मा यांना आसाममधील भाजपचे चाणक्य म्हटले जाते. त्यांच्या प्रयत्नांमुळेच ईशान्य भारतात कमळ फुलले आहे. शर्मा हे आक्रमक राजकारणी आहेत. काँग्रेसमधून राजकारणाची सुरवात करणारे शर्मा हे भाजपमध्ये दाखल झाले होते. शर्मा यांच्या रणनितीनुसार २०१६ मध्ये भाजप मैदानात उतरला होता. याचमुळे काँग्रेसचा पराभव झाला. हिमंता हे आसाममधील भाजपचे बड्या नेत्यांपैकी एक मानले जात आहेत. 

भाजपने पुन्हा सत्ता स्थापन केली तर सर्वानंद सोनोवाल यांच्या जागी शर्मा यांची मुख्यमंत्रिपदी वर्णी लागू शकते, अशी चर्चा सध्या भाजपमध्ये सुरू आहे. शर्मा यांची लोकप्रियता वाढत चालली असून शर्मा यांनी उमेदवारी अर्ज भरताना मोठे शक्तिप्रदर्शन केले होते. यामुळे भाजपकडून त्यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे आणले जाण्याची शक्यता आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com