भाजप उमेदवाराच्या गाडीला लिफ्ट मागणं निवडणूक अधिकाऱ्यांना पडलं चांगलंच महागात! - election commission suspends four polling officers after evm controversy | Politics Marathi News - Sarkarnama

भाजप उमेदवाराच्या गाडीला लिफ्ट मागणं निवडणूक अधिकाऱ्यांना पडलं चांगलंच महागात!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 एप्रिल 2021

विधानसभा निवडणुकीमुळे आसाममधील राजकीय वातावरण तापले असून, भाजप उमेदवाराच्या गाडीला लिफ्ट मागणे आयोगाच्या अधिकाऱ्यांना महागात पडले आहे. 
 

करीमगंज : विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आसाममध्ये काल (ता.१) मतदान झाले. मतदान झाल्यानंतर ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या आयोगाच्या अधिकाऱ्यांना सरकारी गाडी बंद पडली म्हणून भाजप उमेदवाराच्या गाडीला लिफ्ट मागणे चांगलेच महागात पडले आहे. आयोगाने प्रकरणात चार जणांवर थेट निलंबनाची कारवाई केली आहे.  

पाथरकांडी येथील राताबारी विधानसभा मतदारसंघासाठी काल मतदान झाले. मतदान झाल्यानंतर ईव्हीएम एका गाडीतून नेली जात होती. याची माहिती मिळताच काँग्रेस आणि एआययूडीएफ या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ही गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला होता. त्यावेळी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी त्यांची गाडी बंद पडल्याने त्यांनी एका गाडीला लिफ्ट मागितल्याचे सांगितले. नंतर ही गाडी भाजप उमेदवाराची असल्याचे निदर्शनास आल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, निवडणूक विषयक वाहतूक नियमांचा भंग केल्याप्रकरणी निवडणूक अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. निवडणूक अधिकारी आणि इतर तीन अधिकाऱ्यांवर या प्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी आयोगाच्या विशेष निरीक्षकांना अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. 

हेही वाचा : ईव्हीएम प्रकरणात निवडणूक आयोग पडला तोंडघशी 

ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या अधिकाऱ्यांची गाडी काल बंद पडली. ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या इतर गाड्यांच्या ताफ्यापासून ही गाडी एकटी मागे पडली होती. रहदारी आणि खऱाब हवामानामुळे हे घडले. त्यांची गाडी बंद पडल्यानंतर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. दुसरी व्यवस्था होण्याआधीच या अधिकाऱ्यांनी दुसऱ्या गाडीला लिफ्ट मागितली, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. 

हेही वाचा : मतदानानंतर ईव्हीएम भाजप उमेदवाराच्या गाडीत 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या गाडीला अडवणाऱ्या विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याच आले आहेत. मतदान यंत्रे घेऊन जाणाऱ्या गाडीवर हल्ला केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या घटनेनंतर ईव्हीएमची आयोगाने तपासणी केली. यात ईव्हीएमशी काहीही छेडछाड झाली नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

ईव्हीएमच्या मुद्द्यावर विरोधी पक्ष वारंवार भाजपला लक्ष्य करीत असतात. भाजपकडून ईव्हीएममध्ये फेरफार केले जात असल्याचा आरोप विरोधक नेहमी करीत आहेत. आता निवडणूक झाल्यानंतर भाजप उमेदवाराच्या गाडीत ईव्हीएम सापडल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. यात काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय विरोधक व्यक्त करीत आहेत. 

आसाममध्ये काल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान झाले. राज्यातील १३ जिल्ह्यांतील एकूण ३९ मतदारसंघात काल (ता.१) मतदान झाले. यात ७४.७६ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. राज्यात तिसऱ्या व अंतिम फेरीतील मतदान ४ एप्रिलला होणार असून, मतमोजणी व निकाल २ मे रोजी जाहीर होईल. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख