बिगूल वाजला...तब्बल 18.68 कोटी मतदार निवडून देणार 824 आमदार! - election commission of india announces dates for five assembly elections | Politics Marathi News - Sarkarnama

बिगूल वाजला...तब्बल 18.68 कोटी मतदार निवडून देणार 824 आमदार!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021

निवडणूक आयोगाकडून आज पाच राज्यातील निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. 

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाकडून आज पाच राज्यातील निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आसाम, केरळ आणि पुदुच्चेरी या राज्यांत विधानसभेच्या निवडणुका 27 मार्च ते 29 एप्रिल कालावधीत होणार आहेत. सर्व ठिकाणी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांचा पुरेसा बंदोबस्त असणार आहे आणि सर्व निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना लस दिली जाणार आहे. 

मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा म्हणाले की, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, आसाम या राज्यांसह पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील एकूण 824 विधानसभा मतदारसंघात निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत 18.68 कोटी मतदार आहेत. एकूण 2.7 लाख मतदान केंद्रे असणार आहेत. सर्व ठिकाणी सीएपीएफचा पुरेसा बंदोबस्त असणार आहे. संवेदनशील मतदान केंद्रावरही सीएपीएफ तैनवात असेल. सर्व मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात येणार आहे. यासाठी निवडणूक कर्मचाऱ्यांनी फ्रंटलाईन वर्कर मानले जाईल. 

निवडणूक तारखा : 
तमिळनाडू : एकाच टप्प्यात 6 एप्रिल  
पश्चिम बंगाल : पहिला टप्पा 27 मार्च, दुसरा टप्पा 1 एप्रिल, तिसरा टप्पा 6 एप्रिल, चौथा टप्पा 10 एप्रिल, पाचवा टप्पा 17 एप्रिल, सहावा टप्पा 22 एप्रिल, सातवा टप्पा 26 एप्रिल, आठवा टप्पा  29 एप्रिल 
केरळ : एकाच टप्प्यात 6  एप्रिल, मल्लपुरम विधानसभा पोटनिवडणूक 6 एप्रिल  
आसाम : पहिला टप्पा 27 मार्च, दुसरा टप्पा 1 एप्रिल, तिसरा टप्पा 6 एप्रिल  
पुद्दुचेरी : एकाच टप्प्यात 6 एप्रिल 
सर्व राज्यांतील मतमोजणी : 2 मे 

या पाच राज्यांपैकी सध्या केवळ आसाममध्येच भाजपची सत्ता आहे. तर पुदुच्चेरीमध्ये सरकार कोसळल्यानंतर काँग्रेसची पाचपैकी एकाही राज्यात सत्ता नाही. आसाममधील सत्ता टिकविण्यासह अन्य राज्यांत सत्तेत येण्यासाठी भाजपने जोर लावला आहे. पाचही राज्यांमध्ये भाजप, काँग्रेससह स्थानिक प्रादेशिक पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. सभा, विविध विकासकामांचे उद्घाटन यांसह विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. 

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल भाजप आमनेसामने

पश्चिम बंगालमध्ये सध्या तृणमूल काँग्रेस सत्तेत असून ममता बॅनर्जी मुख्यमंत्री आहेत. 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत तृणमूलला 294 पैकी 211 जागा मिळाल्या होत्या. तर डावे पक्ष व काँग्रेसचे 76 उमेदवार निवडूण आले. भाजपला केवळ 3 जागा मिळाल्या होत्या. मात्र, यावेळी भाजपने सत्तापालट करण्यासाठी जोर लावला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने 42 पैकी 28 जागा जिंकल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. सध्या तृणमूल विरुध्द भाजप असेच चित्र दिसत आहे. तर डावे पक्ष व काँग्रेसची आघाडी या निवडणुकीतही कायम राहणार आहे. 

आसाममध्ये भाजपची सत्ता

2016 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत येथील मतदारांनी भाजपच्या बाजूने कौल दिला. भाजपाल 126 पैकी 86 जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसला 26 आणि इतर पक्षांना 14 जागा मिळाल्या. आसममध्ये सत्ता टिकविण्यासाठी भाजपने जोरदार प्रचार सुरू केला आहे. सीएएचा मुद्दा या निवडणुकीत महत्वाचा ठरण्याची शक्यता आहे. 

तमिळनाडूत शशिकला फॅक्टर महत्वाचा

तमिळनाडूमध्ये सध्या अण्णाद्रमुकची सत्ता असली तरी आगामी निवडणुकीत पक्षांतून निलंबित करण्यात आलेल्या शशिकला यांची भूमिका महत्वाची मानली जात आहे. तुरूंगातून सुटका झाल्यानंतर त्यांनी तसे संकेतही दिले आहेत. तमिळनाडू विधानसभेत 234 आमदार असून सध्या अण्णाद्रमुक आघाडीकडे 134 जागा आहेत. द्रमुक आणि काँग्रेसच्या आघाडीला 98 जागा मिळाल्या होत्या. तर भाजपला या राज्यात खाते खोलता आले नाही. मात्र, यावेळी भाजपने सत्ताधारी पक्षासोबत आघाडी केली आहे. त्यामुळे यावेळी भाजपला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

केरळमध्ये डाव्यांचा जोर

केरळमध्ये डाव्या पक्षांची सत्ता आहे. एकुण 140 जागा असून 2016 मध्ये डाव्यांना 91 जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसला 47 जागा अन् इतरांना दोन जागा मिळाल्या होत्या. भाजपला याही राज्यात खाते खोलता आले नव्हते. यावेळी मात्र भाजपने जोर लावला आहे. केरळ हा डाव्यांचा गड असल्याने भाजपने ताकद लावली आहे. 

पुदुच्चेरीमध्ये राष्ट्रपती राजवट

केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुदुच्चेरीमध्ये सध्या राष्ट्रपती राजवट आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बहुमत गेल्याने काँग्रेसला सत्ता सोडावी लागली. त्यामुळे काँग्रेसच्या हातातून आणखी एक राज्य निसटले. पुदुच्चेरीमध्ये 30 जागांसाठी निवडणुक होणार आहे. राज्यात तीन नामनिर्देशित सदस्य असतात. 2016 मध्ये काँग्रेसने 19 जागा जिंकल्या होत्या. तर एआयएडीएमके व एआयएनआरसी या पक्षांना प्रत्येकी 4 जागा मिळाल्या होत्या. भाजपचे तीन नामनिर्देशित सदस्य आहेत. 

Edited By Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख