निवडणूक आयोगाचा भाजपला दणका; मुख्यमंत्रिपदाचा दावेदार असलेल्या नेत्यावरच कारवाई - election commission barred himanta biswa sarma from campaigning | Politics Marathi News - Sarkarnama

निवडणूक आयोगाचा भाजपला दणका; मुख्यमंत्रिपदाचा दावेदार असलेल्या नेत्यावरच कारवाई

वृत्तसंस्था
शनिवार, 3 एप्रिल 2021

भाजपकडून मुख्यमंत्रिपदाचे दावेदार मानले जाणारे नेते हिमंता बिस्वा शर्मा यांना निवडणूक आयोगाने दणका दिला आहे. 
 

गुवाहाटी : आसाममधील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात भाजप आणि काँग्रेस असा सामना रंगला आहे. भाजपकडून मुख्यमंत्रिपदाचे दावेदार मानले जाणारे नेते हिमंता बिस्वा शर्मा यांना निवडणूक आयोगाने दणका दिला आहे. विरोधी नेत्याला तुरुंगात टाकण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्थेचा (एनआयए) वापर करण्याची जाहीर धमकी देणे महागात पडले आहे. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपला हा मोठा धक्का बसला आहे. 

आसाम राज्यात तीन टप्प्यांत मतदान होत आहे. दोन टप्पे झाले असून, तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी (ता.६) होत आहे. आता मुख्यमंत्रिपदाचे दावेदार मानले जाणारे आणि भाजपचे स्टार प्रचारक हिमंत बिस्वा शर्मा यांना निवडणूक आयोगाने दणका दिला आहे. त्यांच्यावर ४८ तास प्रचार करण्यास बंदी घालण्यात आली आहे. यामुळे आता अखेरच्या टप्प्यात ते प्रचार करु शकणार नाहीत. याचा भाजपला फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

शर्मा यांनी काँग्रेसचा सहकारी पक्ष बोडोलँड्स पीपल्स फ्रंटचे नेते हगरामा मोहिलरी यांना धमकी दिली होती. राष्ट्रीय तपास संस्थेचा वापर करुन त्यांना तुरुंगात टाकण्याची जाहीर धमकी शर्मा यांनी दिली होती. कारवाई करण्याआधी निवडणूक आयोगाने शर्मा यांच्याकडे खुलासा मागवला होता. परंतु, त्यांचा खुलासा समाधानकारक नसल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. 

आसाममध्ये विधानसभेच्या एकूण 126 जागा आहेत. भाजपचे हिमंता शर्मा हे आसामच्या जलुकबारी मतदारसंघातून उभे आहेत. नुकतेच प्रचारावेळी ते म्हणाले होते की, गेल्या पंचवीस वर्षांपासून मी आमदार आहे. गेल्या पाच वर्षांत आसाममध्ये भाजपच्या सरकारने चांगले काम केले आहे. त्यामुळे राज्यातील 90 टक्के मतदार भाजपला मतदान करतील. यामुळे भाजप आघाडीला 90 हून अधिक जागा मिळतील. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपला 59 जागा मिळाल्या होत्या. यंदा 63 ते 66 जागा मिळतील. भाजप आघाडीला एकूण 90 पेक्षा जास्त जागा मिळतील.

हिमंता बिस्वा शर्मा यांना आसाममधील भाजपचे चाणक्य म्हटले जाते. त्यांच्या प्रयत्नांमुळेच ईशान्य भारतात कमळ फुलले आहे. शर्मा हे आक्रमक राजकारणी आहेत. काँग्रेसमधून राजकारणाची सुरवात करणारे शर्मा हे भाजपमध्ये दाखल झाले होते. शर्मा यांच्या रणनितीनुसार २०१६ मध्ये भाजप मैदानात उतरला होता. याचमुळे काँग्रेसचा पराभव झाला. हिमंता हे आसाममधील भाजपचे बड्या नेत्यांपैकी एक मानले जात आहेत. 

भाजपने पुन्हा सत्ता स्थापन केली तर सर्वानंद सोनोवाल यांच्या जागी शर्मा यांची मुख्यमंत्रिपदी वर्णी लागू शकते, अशी चर्चा सध्या भाजपमध्ये सुरू आहे. शर्मा यांची लोकप्रियता वाढत चालली असून शर्मा यांनी उमेदवारी अर्ज भरताना मोठे शक्तिप्रदर्शन केले होते. यामुळे भाजपकडून त्यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे आणले जाण्याची शक्यता आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख