मोठी बातमी : भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनाच निवडणूक आयोगाचा दणका - election commission ban bjp west bengal president dilip ghosh from campaigning | Politics Marathi News - Sarkarnama

मोठी बातमी : भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनाच निवडणूक आयोगाचा दणका

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 एप्रिल 2021

पश्चिम बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनाच निवडणूक आयोगाने आता दणका दिला आहे.

कोलकता : प्रचारसभेत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निवडणूक आयोगाने  24 तासांच्या प्रचारबंदीची कारवाई केली होती. आता पश्चिम बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनाच निवडणूक आयोगाने दणका दिला आहे. प्रचारादरम्यान केलेले वादग्रस्त वक्तव्य त्यांना भोवले आहे.  

दिलीप घोष यांनी प्रचारादरम्यान सीतलकुची येथील हिंसाचाराबद्दल प्रक्षोभक आणि चिथावणीखोर वक्तव्ये केली होती. यावर निवडणूक आयोगाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. याला घोष यांनी दिलेले उत्तर समाधानकारक नसल्याने आयोगाने कारवाईचा बडगा उगारला आहे. घोष यांना पुढील 24 तास प्रचारबंदी करण्यात आली आहे. घोष यांच्यावरील प्रचारबंदी आज सायंकाळी 7 वाजल्यापासून उद्या (ता.16) सायंकाळी 7 वाजेपर्यंत कायम असेल. 

घोष यांच्यावर प्रचारबंदी करण्यात आल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. घोष यांच्यावर राज्यातील पक्षाच्या प्रचाराची आणि संघटनात्मक धुरा आहे. यासाठी भाजपने त्यांना विधानसभेचे तिकिट देऊन मैदानातही उतरवले नाही. आता निवडणूक आयोगाने केलेल्या कारवाईमुळे उद्या घोष यांना प्रचारापासून दूर राहावे लागेल. अतिशय महत्वाच्या टप्प्यावर प्रचार आलेला असताना भाजपला हा धक्का बसला आहे.

याआधी निवडणूक आयोगाने ममतांवर कारवाई केली होती. प्रचारसभेमध्ये ममतांनी मुस्लिमांच्या मतदानासंदर्भात वक्तव्य आणि केंद्रीय पोलीस दलांविरोधात विद्रोह करण्याचे आवाहन लोकांना केल्याचा आरोप भाजपने केला होता. त्यानुसार निवडणूक आरोगाने ममतांना नोटीस बजावली होती. त्यावर आयोगाने ममतांवर कारवाईचा निर्णय घेतला. त्यानुसार  24 तास ममतांना प्रचारास मनाई करण्यात आली होती. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात ममतांनी कोलकतामधील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन केले होते. 

बंगालमधील निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. आतापर्यंत चार टप्प्यातील मतदान पार पडले असून, आणखी चार टप्पे शिल्लक आहेत. तृणमूलसाठी ममता बॅनर्जी या एकट्याच किल्ला लढवत आहेत. त्यातच त्यांच्या पायाला दुखापत झालेली असल्याने त्यांच्या प्रचाराला आधीच मर्यादा आल्या आहेत. त्यानंतरही त्या भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख