पहाटे पाचला शपथ घेताना नीतिमत्ता कुठे गेली होती? खडसेंचा सवाल

भाजपला सोठचिठ्ठी दिलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या वेळी खडसे यांनी जळगावमध्ये मोठे शक्तिप्रदर्शन करण्याचे सूतोवाच केले आहे.
eknath khadse targets devendra fadnavis after joining ncp
eknath khadse targets devendra fadnavis after joining ncp

मुंबई : भाजपला रामराम केलेल्या एकनाथ खडसे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या वेळी त्यांनी भाजपच्या नेतृत्वावर जोरदार हल्लाबोल केला. आयुष्यातील 40 वर्षे ज्या  राजकारणात काढली पण महिलेला समोर ठेवून राजकारण कधी केले नाही. पण, माझ्याविरोधात राजकारण करण्यासाठी महिलेला पुढे करण्यात आले, असा हल्लाबोल खडसे यांनी आज केला. पहाटे 5 वाजता शपथ घेतली त्यावेळी नीती आणि नीतिमत्ता कुठे गेली होती, असा टोलाही त्यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला.  

खडसे यांनी आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या वेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. या वेळी बोलताना खडसे म्हणाले की, आयुष्यातील 40 वर्षे भाजपच्या उभारणीपासून आतापर्यंत मी काम केले. विधानसभेत माझी बदनामी आणि छळवणूक झाली हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. माझा गुन्हा काय, माझ्याविरोधात नेमके काय आहे, याचे उत्तर मला आजपर्यंत मिळालेले नाही. मी खूप संघर्ष केला. संघर्ष करणे हा माझा स्थायी स्वभाव आहे. भाजपच्या सुरूवातीपासून मी काम केले. समोरासमोर लढलो पण पाठीत खंजीर कधी खुपसला नाही. असा प्रयोग मी कधीच केला नाही. 

मी जयंतरावांशी पक्ष प्रवेशाबाबत बोललो त्यावेळी, ते म्हणाले की तुमच्या मागे ईडी (सक्त वसुली संचालनालय) लावतील. त्यावर मी म्हणाले होतो की, ते ईडी लावतील तर मी सीडी लावेल. तुम्हालाही माहिती हा काय प्रकार आहे. भाजपने मला अडगळीत टाकले होते. यापुढे संधीही मिळण्याची शक्यता नव्हती. मी न मागता भाजपने रोहिणी ताईंसाठी तिकिट दिले. ऐनवेळी तिकिट देण्यात आले होते. 

आयुष्यभर पक्षासाठी काम केले. पक्षाने माझ्यासाठी काय केले, असा सवाल उपस्थित करुन खडसे म्हणाले की, राजकारणात मी 40 वर्षे काढली पण महिलेला समोर ठेवून राजकारण कधीच केले नाही. माझ्या मागे लाचलुचपत प्रतिबंधक विभागासोबत महिलाही लावण्यात आली. मला छळण्यात आले. माझ्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला . अतिशय खालच्या पातळीवरील असे राजकारण बरोबर नाही माझ्या मागे दोन वेळा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग लावण्यात आला.

जेवढ्या निष्ठेने भाजपचे काम केले तेवढ्याच निष्ठेने आता राष्ट्रवादीचे काम करणार आहे. मी ज्या वेगाने भाजपने वाढविली त्याच्या दुप्पट वेगाने राष्ट्रवादी वाढवणार आहे. तुम्ही मला साथ द्या आणि पाठीशी भक्कम उभे राहा. इथे उपस्थित असलेले अनेक जण हे पक्षाच्या चिन्हावर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये निवडून गेलेले आहेत. त्यामुळे त्यांनी पक्षांतर केले नाही. ते लवकरच राष्ट्रवादीत दाखल होतील. 

मी राष्ट्रवादीत जावे, अशी कार्यकर्त्यांची भावना होती. मला बऱ्याच पक्षांच्या ऑफर आला होत्या. पण, सर्वच कार्यकर्त्यांची इच्छा मी राष्ट्रवादीत जावे अशी होती. तुम्हाला भाजपमध्ये भवितव्य नाही, असा सल्ला दिल्लीत भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांनीही दिला होता.  मग कुठे जाऊ, असे त्यांना विचारले. त्यांनी मला राष्ट्रवादीत जाण्यास सांगितले, असे खडसे यांनी स्पष्ट केले.  

जळगावमध्ये लवकरच मी मोठा कार्यक्रम करणार आहे. तेथील सर्वांत मोठे मैदान सागरपार्क ओतप्रोत भरुन दाखवणार आहे. त्यावेळी मी माझी ताकद दाखवून देणार आहे. पवार साहेबांचे मार्गदर्शन आम्हाला मिळणार आहे. माझ्या डोक्यावरचे ओझे आता हलके वाटत आहे, असे खडसे यांनी सांगितले.   

माझ्यावर भूखंड प्रकरणी आरोप झाले. काही दिवस जाऊ द्या. कोणी किती भूखंड घेतले, तेच मी आता दाखवतो. मी अन्याय करणाऱ्यातला नाही. जाणूनबुजून कोणाबाबत काही करणारा नाही. पण नियमाच्या बाह्य काम करणाऱ्यांवर कारवाई व्हावी. मी राजकीय जीवनातून घरीच बसलो असतो. दुसरा पर्यायच नव्हता. भाजपमधी नेत्यांनी मला मार्गदर्सन करा असे सांगितले होते. आता मला भाजपपेक्षा राष्ट्रवादी चांगला वाटतो. मी पुढील काळात राष्ट्रवादीचे बळ वाढवणार हा शब्द देतो, असे खडसे यांनी नमूद केले. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com