देवेंद्र फडणवीसांना संन्यास घेण्याला एकनाथ खडसेंनीच केला विरोध - eknath khadse says devendra fadnavis should be leader of opposition | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

देवेंद्र फडणवीसांना संन्यास घेण्याला एकनाथ खडसेंनीच केला विरोध

कैलास शिंदे
सोमवार, 28 जून 2021

सत्ता हाती मिळाल्यास ओबीसी प्रश्न सोडविणार अन्यथा संन्यास घेणार, अशी जाहीर घोषणा माजी मुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. 

जळगाव : सत्ता हाती मिळाल्यास ओबीसी (OBC) प्रश्न सोडविणार अन्यथा संन्यास घेणार, अशी जाहीर घोषणा माजी मुख्यमंत्री व भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) केली आहे. फडणवीसांचे जुने सहकारी व राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी मात्र याला विरोध केला आहे. फडणवीसांनी संन्यास न घेता पाच वर्षे विरोधी पक्षनेते राहावे, असा उपरोधिक टोला खडसेंनी मारला आहे. 

जळगाव येथे पत्रकारांशी बोलताना खडसे म्हणाले की, वेगळा विदर्भ झाला नाही तर लग्न करणार नाही, अशी शपथ फडणवीसांनी घेतली होती. परंतु, त्यांनी लग्न केले आणि त्यांना मुलगीही झाली, त्यामुळे या सर्व त्यांच्या वगल्ना आहेत. त्यांना सत्ता मिळाली तरच ते ओबीसींचा प्रश्न सोडविणार, नाही दिली तर ते ओबीसी प्रश्नाला विरोध करणार ही भूमिका चुकीची आहे. मुळातच ओबीसींचा विषय केंद्र सरकारच्या हातात आहे याची फडणवीसांनी माहिती आहे. 

हेही वाचा : सुप्रियाताईंसमोरच अजितदादा मुर्दाबादच्या घोषणा 

फडणवीस हे मुखमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात त्यांनी, पंकजा मुंडे आणि छगन भुजबळ यांनी केंद्र सरकारला जनगणनेचा डेटा द्यावा यासाठी पत्र लिहिले होते. परंतु, केंद्र सरकारने त्याला उत्तरच दिले नाही. राज्यात पाच वर्षे देवेंद्र फडणवीस यांचे सरकार होते. या कालावधीत त्यांनी केंद्राकडून डेटा उपलब्ध करून घ्यायला हवा होता, मात्र त्यांनी तो घेतला नाही. परंतु घाईत अध्यादेश काढला. त्यांना माहीत होते की डेटा उपलब्ध नाही तर आरक्षण टिकणार नाही. त्यामुळे त्यांनी ही फसवणूक केली आहे, असे खडसेंनी सांगितले. 

केंद्राकडून डेटा आणायचा नाही आणि दुसरीकडे राज्यात आम्हीच ओबीसींच्या पाठीशी आहोत, हे दाखवायचे ही दुटपी भूमिका आहे. आताही केंद्रात त्यांचेच सरकार आहे  त्यांनी केंद्राकडून हा डेटा आणावा. राज्य सरकारने मागासवर्गीय आयोग स्थापन केला असून, त्या माध्यमातून जनगणना होऊ शकेल. फडणवीस यांनी जनतेसाठी हे कार्य करावे. त्यांनी संन्यास घेऊ नये. त्यांचे विरोधी पक्षनेते म्हणून सरकारला सल्ला देण्याचे काम चांगले सुरू आहे. विरोधी पक्षनेते म्हणून त्यांचे काम चांगले आहे. त्यांनी पाच वर्षे विरोधी पक्षनेतेपदी राहावे आणि सरकारला मार्गदर्शन करावे, असेही खडसे यांनी नमूद केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख