#NEET, JEE  : दीडशे शिक्षणतज्ज्ञांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र.. - Education experts letter to Prime Minister Narendra Modi | Politics Marathi News - Sarkarnama

#NEET, JEE  : दीडशे शिक्षणतज्ज्ञांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र..

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 ऑगस्ट 2020

देश-परदेशातील १५० कुलगुरू व शिक्षणतज्ज्ञांनी पंतप्रधानांना लिहिलेले पत्र सार्वजनिक करण्यात आले  आहे.

नवी दिल्ली : कोरोनाचे संकट अजूनही गंभीर असताना केंद्रातील मोदी सरकार जेईई व नीट परीक्षा घेण्यावर ठाम आहे. एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी परीक्षा देण्यास एकत्र आल्यास कोरोना संक्रमणाची भीती नाकारता येत नाही. एकीकडे कोरोनाचे संकट तर दुसरीकडे बिहार, आसाममध्ये गंभीर पूरस्थिती आहे.

अशा वेळी विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास भाग पाडून त्यांच्यावर मानसिक दडपण आणण्याचा हा प्रकार आहे. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीतही या परीक्षा घेण्यास विरोध करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या परीक्षा घेण्याच्या भूमिकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

या परीक्षांवरून केंद्र व राज्य सरकार यांच्यामध्ये संघर्ष पेटला आहे. केंद्र सरकारच्या हट्टाच्या बाजूने आता शेकडो शिक्षणतज्ज्ञांची फौज सरकारच्या समर्थनार्थ मैदानात उतरली आहे. देश-परदेशातील १५० कुलगुरू व शिक्षणतज्ज्ञांनी पंतप्रधानांना लिहिलेले पत्र सार्वजनिक करण्यात आले असून त्यात, या परीक्षा रद्द केल्यास लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याबरोबर केलेली ती गंभीर तडजोड ठरेल, असे म्हटले आहे.

मोदी यांना पाठविलेल्या या पत्रावर लंडन, कॅलिफोर्निया, हिब्रू, जेरूसलेमचे बेन गुरियन, दिल्ली, अलिगड, गुजरात, लखनौ, बनारस हिंदू, जेएनयू आदी विद्यापीठांचे कुलगुरू व शिक्षणतज्ज्ञांच्या सह्या आहेत. विशेष म्हणजे हा पत्रव्यवहार करणाऱ्यांत महाराष्ट्रातील एकही नाव दिसत नाही.

यापूर्वी मोदी सरकार सत्तेवर आल्यावर असहिष्णुतेच्या विरोधातील देशव्यापी आंदोलन जोरात होते त्या काळातही सत्तारूढ गोटातून शेकडो निर्माते-कलाकार-दिग्दर्शकांच्या सहीचे पत्र अशाच पद्धतीने पाठविण्यात आले होते याकडे जाणकारांनी लक्ष वेधले.

शिक्षणतज्ज्ञांनी पत्रात म्हटले आहे की, ‘‘ काही लोक आपल्या राजकीय अजेंड्यासाठी जेईई-नीटला विरोध करून विद्यार्थ्यांच्या भविष्याबरोबर खेळत आहेत. शैक्षणिक उपक्रम आरोग्य दिशानिर्देशांचे काटेकोर पालन करूनच व्हायला हवेत.

पण राष्ट्रीय पात्रता परीक्षा एकाच कारणावरून वारंवार रद्द करणे विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने अयोग्य आहे. राजकीय विरोधामुळे पुन्हा या परीक्षा रद्द झाल्या तर या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाईल. या नुकसानाला कोण जबाबादार असेल? आमचे युवक व विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी कोणत्याही किमतीवर तडजोड केली जाऊ नये.’’

विरोधी पक्षांकडून जेईई आणि नीट या परीक्षांना होणारा विरोध कायम असताना मोदी सरकारने मात्र या परीक्षा निर्धारित वेळेतच घेण्याचा पवित्रा कायम ठेवला आहे. सरकार व शिक्षण मंत्रालय याबाबत ताठर भूमिकेत असून दोन्ही परीक्षांसाठीचे ऑनलाइन हॉल तिकीट किती विद्यार्थ्यांनी डाऊनलोड केले याची ताजी माहिती  वेळोवेळी दिली जात आहे.

या परीक्षा घेण्याबाबत बहुतांश विद्यार्थीच आग्रही आहेत असा दावा केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी केला आहे. ज्या लाखो विद्यार्थ्यांनी काही तासांतच ऑनलाइन हॉल तिकिटे डाऊनलोड केली त्यातून त्यांचे मत स्पष्ट दिसते की कोणत्याही किमतीवर या परीक्षा झाल्याच पाहिजेत.

 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख