ईडीची जप्ती आलेल्या जरंडेश्वर कारखान्याची अशीही शोकांतिका... - ED has attached assets of Jarandeshwar Sahkari Sugar Karkhana | Politics Marathi News - Sarkarnama

ईडीची जप्ती आलेल्या जरंडेश्वर कारखान्याची अशीही शोकांतिका...

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 1 जुलै 2021

माजी आमदार व महसूलमंत्री शालिनीताई पाटील संस्थापिका, अध्यक्षा असलेला हा कारखाना १६ जुलै २०१० रोजी जप्त राज्य बॅंकेने जप्त केला होता. 

सातारा : सक्तवसुली संचालनालयाची (ED) जप्ती आलेला जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना सध्या भलताच चर्चेत आला आहे. या कारखान्यावरील शंभर कोटींचे थकित कर्ज, राज्य सहकारी बँकेची जप्ती आणि त्यानंतर लिलावाद्वारे झालेली विक्री, त्याला न्यायालयात दिलेले आव्हान अन् त्याचा निकाल लागण्यापूर्वीच ईडीची जप्ती यांमुळं हा कारखाना वादग्रस्त ठरला आहे. त्यातच भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हा कारखाना असल्याचा दावा केला आहे. (ED has attached assets of Jarandeshwar Sahkari Sugar Karkhana)

जरंडेश्वर कारखाना शंभर कोटींच्या थकीत कर्जानंतर चर्चेत आला होता. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने शंभर कोटी रूपयांच्या थकीत कर्जापोटी माजी आमदार व महसूलमंत्री शालिनीताई पाटील संस्थापिका, अध्यक्षा असलेला चिमणगांव (ता. कोरेगाव) येथील कारखाना १६ जुलै २०१० रोजी जप्त केला. या कारवाईमुळे कोरेगाव व खटाव तालुक्यांतील सुमारे २७ हजार सभासद तसेच साडेसहाशे कामगारांच्या रोजी-रोटीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.

हेही वाचा : किरीट सोमय्या म्हणतात...ईडीची जप्ती आलेला जरंडेश्वर कारखाना अजित पवारांचा!

जरंडेश्वर कारखान्याला ७८ कोटी ९० लाख रुपयांच्या  थकीत कर्जासाठी ६ जून २००८ रोजी नोटीस देऊनही कारखान्याने कर्जच भरले नाही. त्यानंतर कारखाना जप्तीचा निर्णय घेण्यात आला. व्यवस्थापन कोर्टात गेले असता कर्ज भरण्यासाठी १५ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती, मात्र त्याही मुदतीत कर्जाचा भरणा झाला नसल्याने अखेर जप्तीची कारवाई केली गेली. त्यानंतर राज्य सहकारी बँकेने थकित कर्जापोटी जरंडेश्वर कारखाना सप्टेंबर २०१० रोजी लिलावात काढला. त्यावेळी कारखान्यांची लिलावाची किंमत ४०.८० कोटी रूपये निश्चित केली होती. 

लिलावात १३ संस्थांनी बोली लावली होती. यामध्ये राजाराम बापू सहकारी साखर कारखाना, किसन वीर सहकारी साखर कारखाना, दौंड शुगर, वारणा कारखाना, चंद्रभागा शुगर मुंबई आदींचा समावेश होता. पहिल्या दोन बोलीचे लखोटे राज्य बँकेच्या मुख्य कार्यालयात सर्व बोली लावणाऱ्यांच्या पुढे उघडून जाहीर करण्यात आली होती. मात्र, तिसऱ्या फेरीसाठी लखोटे मागवले. मात्र, हे लखोटे सगळ्यासमोर फोडणे आवश्यक होते. मात्र, ऐनवेळी राज्य बँकेच्या व्यवस्थापनाने तिसऱ्या लखोटे संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये जाहीर केले. मात्र, यावर लिलाव घेणाऱ्या सर्वांनी आक्षेप घेतला. 

हेही वाचा : तुम्हाला मुख्यमंत्री व्हावेसे वाटत नाही का? यावर अजितदादा म्हणाले...

त्यानंतर संचालक मंडळाची २८ सप्टेंबर २०१० रोजी बैठक झाली. यामध्ये हे बंद लखोटे उघडण्यात आले. यामध्ये सर्वाधिक बोली मुंबईतील गुरू कमोडिटी प्रा. लि. ची लागली. त्यांनी सुरवातीला ३० कोटी, दुसऱ्या फेरीत ३५ कोटी, तिसऱ्या फेरीत ६५.७५ कोटीची बोली लावली होती. त्यामुळे सर्वाधिक बोली आल्याने गुरू कमोडिटी प्रा. लि.ला हा कारखाना देण्यात आला. या बैठकीस तत्कालिन ऊर्जामंत्री व बँकेचे संचालक अजित पवार, बँकेचे अध्यक्ष माणिकराव पाटील, उपाध्यक्ष बाळासाहेब सरनाईक, तत्कालिन विरोधीपक्ष नेते व संचालक पांडुरंग फुंडकर, आनंदराव अडसूळ, लक्ष्मणराव पाटील व कार्यकारी संचालक डी. एम. मोहोळ उपस्थित होते. 

या लिलावानंतर कारखान्याच्या संस्थापक अध्यक्षा व माजी महसुल मंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांनी या जप्ती व लिलाव या प्रक्रियांवर आक्षेप घेत, विविध न्यायालयात दाद मागीतली होती. अद्याप डॉ. शालिनीताई पाटील यांचा हा न्यायालयीन लढा सुरूच आहे. हा लढा सुरू असतानाच आज ईडीने जरंडेश्वर कारखान्यावर जप्तीची कारवाई केली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख