परब प्रकरणात 'ईडी' सक्रीय; आरटीओ अधिकाऱ्याच्या घरासह तीन ठिकाणे छापे

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपांनंतर परब यांच्यावरही वसुलीचे आरोप झाले होते.
Anil Parab
Anil Parab

मुंबई : परिवहन मंत्री व शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सक्तवसुली संचालनालयाने (ED) रविवारी परब यांना चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. त्यानंतर दुसऱ्यादिवशी ईडीने तीन ठिकाणी छापे टाकूले आहेत. त्यामध्ये परब यांच्या परिवहन विभागातील एका अधिकाऱ्याचाही समावेश असून त्यांच्या घरावर छापा टाकण्यात आला आहे. (ED is conducting raids at three locations in Anil Parab case)

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपांनंतर परब यांच्यावरही वसुलीचे आरोप झाले होते. परिवहन विभागातील अधिकाऱ्यांच्या बदली प्रकरणात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. तसेच देशमुख यांच्या मनी लाँर्डिंग प्रकरणातही परब यांचा समावेश असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याप्रकरणात शनिवारी दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्र्यांची भेट घेत परब यांच्यासह शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या चौकशीची मागणी केली आहे. 

त्यानंतर रविवारी परब यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली. त्यांना 31 ऑगस्ट रोजी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. त्यानंतर सोमवारी दुपारी आरटीओतील अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली. तसेच अन्य दोन ठिकाणीही ईडीने छापे टाकून चौकशी सुरू केली आहे. खरमाटे यांच्यावर बदली प्रकरणात वसुली केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

खरमाटे व वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत पैसे वसुली करून परब यांना दिले जात असल्याची तक्रार करण्यात आली होती. देशमुख यांच्यापाठोपाठ वसुली प्रकरणात विरोधकांकडून परब यांचेही नाव घेण्यात आल्यानं राज्यात खळबळ उडाली होती. पण आतापर्यंत केवळ देशमुख यांचीच चौकशी सुरू होती. पण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटक प्रकरणानंतर भाजपने शिवसेनेला इशारा दिला होता. 

राणेंची जनआशिर्वाद यात्रा संपताच परब यांना ईडीने नोटीस पाठवल्याने शिवसेनेकडून भाजपला लक्ष्य करण्यात आलं. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कायद्याची लढाई कायद्यानेच लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. अशी प्रेमपत्र अनेकवेळा आली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच 'क्रोनोलॉजी समझिये' असं म्हणत त्यांनी थेट गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधल्याचीही चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com