गुड न्यूज : राज्यातील रुग्णसंख्या कमी होतेय; कडक निर्बंधांचा परिणाम - due restrictions in maharashtra covid cases are decreasing | Politics Marathi News - Sarkarnama

गुड न्यूज : राज्यातील रुग्णसंख्या कमी होतेय; कडक निर्बंधांचा परिणाम

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 एप्रिल 2021

देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढलेला असताना महाराष्ट्रातील रुग्णसंख्या आता कमी होऊ लागली आहे. 

नवी दिल्ली : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्य सरकारने कडक निर्बंध लावले आहेत. राज्यातील रुग्णसंख्या अतिशय वेगाने वाढत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला होता. याचा चांगला परिणाम आता दिसू लागला आहे. राज्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढीचा वेग कमी होऊ लागला आहे. राज्यात (काल) 48 हजार 700 रुग्ण सापडले असून, 524 जणांचा मृत्यू झाला आहे. 

महाराष्ट्रात काल 48 हजार 700 रुग्ण सापडले असून, एकूण कोरोना रुग्णांची संख्या 43 लाख 43 हजार 727 वर गेली आहे. राज्यात एकूण 65 हजार 284 मृत्यू झाले आहेत. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 6 लाख 74 हजार 770 आहे. मागील 24 तासांत राज्यात 71 हजार 736 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून बाहेर पडले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 36 लाख 1 हजार 796 आहे. 

याविषयी बोलताना वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख म्हणाले की, महाराष्ट्रातील परिस्थिती आता नियंत्रणात येऊल लागली आहे. निर्बंधांचा परिणाम दिसू लागला असून, रुग्णसंख्येत घट होत आहे. सर्वांनीच नियमांचे पालन केल्यास रुग्णसंख्या आणखी झपाट्याने कमी होईल.  आता आम्ही जास्तीत नागरिकांना कोरोना लस देण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. 

दाखल होणाऱ्या रुग्णांपेक्षा बाहेर पडणारे अधिक 
मुंबईत 3 हजार 876 रुग्ण काल सापडले. मार्च महिन्यापासूनचा हा नीचांकी आकडा आहे. राज्यातील 36 पैकी 15 जिल्ह्यांमध्ये रुग्णालयात दाखल होणाऱ्या नवीन कोरोना रुग्णांपेक्षा बरे होऊन बाहेर पडणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. राज्यात लावलेल्या कडक निर्बंधामुळे रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. आगामी काळात यात आणखी घसरण होईल, अशी माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली. 

देशात 24 तासांत 3 लाख 23 हजार रूग्ण 
देशात आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत कोरोनाचे नवीन 3 लाख 23 हजार 144 रुग्ण सापडले असून, 2 हजार 771 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 1 कोटी 76 लाख 36 हजार 307 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 1 लाख 97 हजार 894 झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख