महाराष्ट्रावर आभाळ फाटलं...138 जणांचा बळी तर हजारो जणांचे स्थलांतर
due to excessive rainfall 138 persons died in maharashtra state

महाराष्ट्रावर आभाळ फाटलं...138 जणांचा बळी तर हजारो जणांचे स्थलांतर

महाराष्ट्रावर आभाळ फाटलं असून, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा हाहाकार सुरु आहे.

मुंबई : महाराष्ट्रावर (Maharashtra Floods) आभाळ फाटलं असून, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा हाहाकार सुरु आहे. पावसामुळे (Maharashtra Rains) मागील काही दिवसांत राज्यभरात तब्बल 138 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात काही  ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या असून, मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

मागील काही दिवसांपासून कोकणातील अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टी सुरू आहे. रायगड, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर 5 ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. महाड तालुक्यातील तळीये गावात  दरड कोसळून 49 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेतील 47 जण अद्याप बेपत्ता असून, तळीयेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. राज्यभरात पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. अनेक ठिकाणी लोक पुरात वाहून गेल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे राज्यातील मृतांची संख्या 138 झाली आहे. 

सातारा जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. अनेक भागात पुराचे पाणी घुसले आहे. जिल्ह्यात पावसामुळे आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. विदर्भातील गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यातही पावसामुळे मृत्यू झाले आहेत, असेही त्यांनी नमूद केले. 

पुणे विभागातील 84 हजार 452 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. यात कोल्हापूर जिल्ह्यातील 40 हजार जणांचा समावेश आहे. त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवणण्यात आले आहे. कोल्हापुरातील 54 गावांचा पुराचा मोठा फटका बसला आहे. याचवेळी 821 गावांना पुराचा काही प्रमाणात फटका बसला आहे. 

अतिवृष्टीमुळे झालेल्या दुर्घटनांमुळे आज दिवसभरात राज्यात आतापर्यंत 89 जणांचा मृत्यू झाला आहे. यात रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधील अपरांत हॉस्पिटलमधील  कोविड केअर सेंटरमध्ये असलेल्या 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळीये येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील 49 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. सातारा जिल्ह्यातील आंबेघर येथे 12 जणांचा तर वाई येथे 2 महिलांचा मृत्यू झाला आहे. रायगडमधील पोलादपूर येथे 11 जणांचा मृत्यू झाला आहे. रत्नागिरीतील खेड तालुक्यातील पोसरे येथे दरड कोसळून एकूण 17 जण मृत्यूमुखी पडले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्र सरकारने पावसामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे. याचबरोबर जखमींवर सरकारी रुग्णालयात मोफत करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाने केली आहे. 
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in