आता घरबसल्या तपासा अँटीबॉडीज; 'डीआरडीओ'ने आणलंय नवीन किट - DRDO develops antibody test kit DIPCOVAN for COVID19 | Politics Marathi News - Sarkarnama

आता घरबसल्या तपासा अँटीबॉडीज; 'डीआरडीओ'ने आणलंय नवीन किट

वृत्तसंस्था
शनिवार, 22 मे 2021

देशातील कोरोना रुग्णसंख्येतील वाढ सुरूच आहे. या परिस्थितीत संरक्षण विकास आणि संशोधन संस्थेने भारतीयांना आनंदाची बातमी दिली आहे. 

नवी दिल्ली : देशातील कोरोना (Covid19) रुग्णसंख्येतील वाढ सुरूच आहे. या परिस्थितीत संरक्षण विकास आणि संशोधन संस्थेने (DRDO)  भारतीयांना आनंदाची बातमी दिली आहे. तुम्हाला घरबसल्या अँटीबॉडीज तपासण्याचे किट (antibody test kit) डीआरडीओने विकसित केला आहे. डीप्कोव्हॅन (DIPCOVAN) असे या किटचे नाव असून, यामुळे लवकरात लवकर कोरोनाचा निदान होणार आहे. 

डीआरडीओने दिलेल्या माहितीनुसार, डीप्कोव्हॅन हे तुमच्या शरीरातील वाढलेल्या अँटीबॉडीज तपासेल. याचबरोबर न्युक्लिओकॅप्सिड (एस आणि एन) ही कोरोनाविषाणूची प्रथिने तपासेल. दिल्लीतील विविध रुग्णालयांतील एक हजार रुग्णांवर चाचण्या करुन हे किट विकसित करण्यात आले आहे. या किटला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) एप्रिल महिन्यात मान्यता दिली आहे. 

हेही वाचा : कोरोनाला थोपवण्यासाठी झटतेय देशातील एकमेव महिला पोलीस आयुक्त 

भारतीय औषध महानियंत्रकांनी या किटला याच महिन्यात परवानगी दिली आहे. याचबरोबर केंद्रीय आरोग्य मंत्रालय, केंद्रीय औषधे मानके नियंत्रण संस्था (सीडीएससीओ) यांनीही या किटच्या वितरण आणि विक्रीला परवानगी दिली आहे. डीप्कोव्हॅन हे मानवी शरीरातील सिरम आणि प्लाझ्मातील  IgG अँटीबॉडीज तपासते. कोरोनाविषाणूशी निगडित अँटीजेनमुळे या अँडीबॉडीजवर प्रभाव पडतो. या किटच्या सहाय्याने केवळ 75 मिनिटात तुम्हाला अँडीबॉडीज तपासता येतात. यात फक्त कोरोनाशी निगडीत अँटीबॉडीज तपासता येतात. या किटचे आयुष्य हे 18 महिने म्हणजेच दीड वर्षांचे आहे. 

डीआरडीओने आधी आणले होते कोरोनावर औषध 
डीआरडीओने कोरोनावर 2-डीजी (2-DG) हे नवीन औषध आणले असून, त्याच्या वापरास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. दिल्लीतील सरकारी रुग्णालयात या औषधाचा वापरही सुरू झाला आहे. डीआरडीओ आणि हैदराबादस्थित डॉ.रेड्डीज लॅबोरेटरीने हे 2-डिऑक्सी-डी-ग्लुकोज (2-डीजी) हे औषध विकसित केले आहे. हे औषध पावडर स्वरुपात सॅशेमध्ये येते आणि पाण्यात मिसळून ते घ्यावे लागते. या औषधाच्या वैद्यकीय चाचण्या झाल्यानंतर त्याच्या वापरास परवानगी देण्याचा निर्णय औषध महानियंत्रकांनी घेतला आहे. हे औषध घेतलेले बहुतांश रुग्ण हे निगेटिव्ह आले आहेत. या औषधामुळे रुग्णालयात दाखल रुग्ण लवकर बरे होतात आणि त्यांना कृत्रिम ऑक्सिजनची फारशी आवश्यकता भासत नाही. 

या औषधाच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या गेल्या वर्षी मे ते ऑक्टोबरमध्ये झाल्या. यात हे औषध कोरोना रुग्णांवर प्रभावी आणि सुरक्षित असल्याचे समोर आले. तसेच, औषध घेतलेले रुग्ण लवकर बरे होत असल्याचे निदर्शनास आले. दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या 110 रुग्णांवर तर तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या 6 रुग्णालयात झाल्या होत्या. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख