डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा पुन्हा होणार नामविस्तार ? - Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University to be renamed? | Politics Marathi News - Sarkarnama

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा पुन्हा होणार नामविस्तार ?

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 29 ऑगस्ट 2020

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नावापुढे भारतरत्न किताबाचा उल्लेख करण्याबाबतचा या विद्यापीठाचा ठराव राज्यपालांकडे पाठविण्यात आला आहे.

मुंबई : मराठवाडा विद्यापीठाला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या या मागणीसाठी 17 वर्षे नामांतराचा ऐतिहासिक लढा लढला. त्याला यश येऊन 14 जानेवारी 1994 रोजी मराठवाडा विद्यापीठाचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामांतर झाले.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना 1990 मध्ये त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात भारत सरकार तर्फे 'भारतरत्न' हा सर्वोच नागरी सन्मान निर्वाणोत्तर देण्यात आला होता. त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नावात भारतरत्न या किताबाचा उल्लेख करणे आवश्यक असल्याची मागणी करणारे निवेदन कल्याण मधील विधिज्ञ तथा संत रोहिदास समाज प्रबोधन मंडळाचे सचिव अॅड. दिलीप वाळंज यांनी नुकतेच रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांना बांद्रा येथे दिले. 

अॅड. दिलीप वाळंज यांच्या दाव्यानुसार कोणत्याही महनीय व्यक्तीला भारताचा पद्मश्री ; पद्मभूषण ; पद्मविभूषण, भारतरत्न असे सर्वोच्च किताब दिल्यास त्यांच्या नावापूर्वी या किताबाचा उल्लेख करणे आवश्यक आहे. त्याबाबत पिटीशन क्र.9 /1994 च्या  सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात तसे स्पष्ट करण्यात आल्याची माहिती अॅड. दिलीप वाळंज यांनी दिली आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नावापुढे भारतरत्न किताबाचा उल्लेख करण्याबाबतचा या विद्यापीठाचा ठराव राज्यपालांकडे पाठविण्यात आला आहे. याबाबत राज्यपालांनी निर्णय घ्यावा, यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिफारस करावी अशी मागणी अॅड. दिलीप वाळंज यांनी ना रामदास आठवले यांची बांद्रा येथे संविधान निवासस्थानी भेट घेऊन केली. यावेळी रिपाइंचे अरुण पाठारे सोबत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नावापुढे भरातरत्न या किताबाचा उल्लेख झाल्यास या विद्यापीठाचा पुन्हा एकदा नामविस्तार होईल, का असा प्रश्न चर्चिला जात  आहे. याबाबत महाराष्ट्राच्या राज्यपालांना लवकरच पत्र पाठविणार असल्याचे आश्वासन रामदास आठवले यांनी अॅड. दिलीप वाळंज यांना दिले. 
Edited  by : Mangesh Mahale      

संबंधित लेख