भारत-चीन वाद, अमेरिकेची अध्यक्षीय निवडणूक अन् मोदींचा पाठिंबा - donald trump wants to help india and china to resolve border conflict | Politics Marathi News - Sarkarnama

भारत-चीन वाद, अमेरिकेची अध्यक्षीय निवडणूक अन् मोदींचा पाठिंबा

वृत्तसंस्था
शनिवार, 5 सप्टेंबर 2020

भारत आणि चीनमध्ये सीमेवर मागील चार महिन्यांपासून तणावाचे वातावरण आहे. यावरुन दोन्ही देशांकडून परस्परविरोधी दावे करण्यात येत आहेत. आता यात डोनाल्ड ट्रम्प यांनी उडी घेतली आहे. 

नवी दिल्ली : भारत आणि चीनमध्ये मागील चार महिन्यांपासून तणावाचे वातावरण आहे. दोन्ही देशांकडून आरोप-प्रत्यारोप होत असताना यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाक खुपसले आहे. हा संघर्ष आता टोकाला गेला असून, यात मी मदत करण्यास तयार आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांना मदतीचा पुळका येण्यामागे तेथील अध्यक्षीय निवडणूक असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाठिंबा मिळाल्याचे ट्रम्प यांनी आता जाहीर केले आहे. 

व्हाइट हाऊसमध्ये बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, भारत आणि चीनमधील संबंध हे खूपच बिघडले आहेत. चीन आणखी आक्रमक भूमिका घेत आहे. अशा परिस्थितीत या दोन देशांतील वाद सोडविण्यासाठी अमेरिका मदत करेल. सध्या आपण मी देशांच्या संपर्कात आहे. तेथील स्थिती मी सातत्याने जाणून घेत आहे. 

ट्रम्प यांनी पुन्हा एकदा अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. तेथील भारतीय वंशाचे अमेरिकी नागरिक हे डेमोक्रॅटिक पार्टीकडे झुकलेले दिसतात. यामुळे त्यांना आकर्षित करण्यासाठी ट्रम्प हे प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भारताशी निगडित मुद्दे वारंवार आणत आहे. अमेरिकेतील निवडणुकीत इतर देशांच्या हस्तक्षेपाच्या मुद्द्यावरुन गदारोळ उडाला होता. तरीही ट्रम्प आता उघडपणे भारताचा मुद्दा उपस्थित करीत आहेत. 

ट्रम्प यांनी आता यापुढे एक पाऊल टाकले आहे. मोदींचा पाठिंबा असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, आम्हाला भारताचा खूप चांगला पाठिंबा मिळाला आहे. याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही पाठिंबा आहे. भारतीय लोक मलाच मदत करतील, असा विश्वास मला वाटत आहे. 

राजनाथसिंह हे सध्या शांघाय सहकार्य परिषदेच्या संरक्षणमंत्र्यांच्या बैठकीसाठी मॉस्कोला रवाना झाले असून, तेथेच त्यांनी चीनच्या संरक्षणमंत्र्यांची भेट घेतली. दोन्ही देशांमध्ये  लडाख भागात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राजनाथसिंह आणि चीनचे संरक्षणमंत्री वेई फेंग यांच्यात शुक्रवारी प्रथमच चर्चा झाली. दोन्ही नेत्यांमध्ये दोन तासांहून अधिक काळ  चर्चा झाली. 

सीमेवरील कारवायांवरून राजनाथसिंह यांनी चीनला पुन्हा एकदा खडे बोल सुनावले. चीनने सीमेवरील स्थिती काळजीपूर्वक हाताळावी, अन्यथा ती आणखी बिघडेल अशी कोणतीही पावले टाकू नयेत, असा इशारा त्यांनी चीनच्या संरक्षणमंत्र्यांना दिला. भारत स्वतःचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता यांचे संरक्षण करण्यासाठी सक्षम असल्याचेही त्यांनी नमूद केले. 

सीमेवरील तणावासाठी चीनने भारताला जबाबदार धरले आहे. चीनने म्हटले आहे की, भारत -चीन सीमेवर सध्या निर्माण झालेल्या तणावामागील सत्य स्पष्ट आहे. याची संपूर्ण जबाबदारी भारतावर आहे. चीन आपली एक इंचही भूमी गमावणार नाही. आमची संरक्षणे दले यासाठी पूर्णपणे तयार आहे. देशाची सार्वभौमता सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. भारताने चर्चेने हा प्रश्न सोडवायला हवा. सीमेवरील लष्कर मागे घेण्याच्या मुद्द्यावर आम्ही भारताशी चर्चा करुन लवकरात लवकर कार्यवाही करण्यास तयार आहोत. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख