यवतमाळ : राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहिमेदरम्यान राज्यभरात 31 जानेवारीला बालकांना पोलिओ लस देण्यात आली. मात्र, यवतमाळमध्ये १२ बालकांना पोलिओचा डोस म्हणून सॅनिटायझर पाजण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या सर्व बालकांची प्रकृती बिघडल्याने त्यांना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी डॉक्टर, अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकेवर ठपका ठेवण्यात आला असून, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
पोलिओ लसीकरणादम्यान १२ बालकांना पोलिओ डोस समजून चक्क सॅनिटायझर पाजण्यात आल्याची घटना घाटंजी तालुक्यातील कापसी (कोपरी) येथे 31 जानेवारीला घडली. लस दिल्यानंतर या सर्व बालकांची प्रकृती बिघडली. यामुळे आरोग्य यंत्रणांची धावाधाव सुरू झाली. या बालकांना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गावच्या सरपंचांनी हे डोस तपासल्यानंतर पोलिओ लशीच्या जागी त्यात सॅनिटायझर असल्याचे समोर आले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलांना लस दिली त्यावेळी लसीकरण केंद्रावर डॉक्टर, आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका असे तिघे हजर होते. या प्रकरणी चौकशी सुरू आहे. या तिघांच्या निलंबनाचा आदेश लवकरच काढण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी एम. देवेंद्रसिंह यांनी रुग्णालयाला भेट देऊन या बालकांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. तसेच, परिस्थितीचा आढावा घेऊन आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा केली. राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहीम काल झाली. घाटंजी तालुक्यातील कापसी (कोपरी) येथे १२ बालकांना पोलिओचा डोस पाजण्याऐवजी सॅनिटायझर पाजण्यात आले. ही सर्व बालके १ ते ५ या वयोगटातील आहेत. मुलांना उलट्यांचा त्रास झाल्याने पालकांच्या लक्षात ही बाब आली. त्यामुळे 31 जानेवारीला रात्रीच १२ बालकांना यवतमाळ येथील जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले.
याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितले की, पोलिओ लस समजून मुलांना सॅनिटाझर पाजण्यात आल्याचे आरोग्य केंद्रावरील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी काही वेळाने सर्व मुलांना पोलिओची लस दिली. घटना घडल्यानंतर उशिरापर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देण्यात आलेली नव्हती.
Edited by Sanjay Jadhav

