पेट्रोल 5 रुपये, डिझेल 4 रुपये अन् गॅस सिलिंडर शंभरने स्वस्त करणार!

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तमिळनाडूत प्रचार शिगेला पोचला आहे. द्रमुकने आज जाहीरनामा जाहीर केला.
dmk releases manifesto for tamil nadu assembly election
dmk releases manifesto for tamil nadu assembly election

चेन्नई : तमिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी मुख्य विरोधी पक्ष असलेल्या द्रमुकने कंबर कसली आहे. पक्षाचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी आज पक्षाचा जाहीरनामा जाहीर केला. यात इंधन दरवाढीच्या भडक्यात होरपळलेल्या जनतेला दिलासा देण्याचे प्रमुख आश्वासन त्यांनी दिले आहे. याचबरोबर इंधन दरवाढीसाठी केंद्र व राज्य सरकारवर द्रमुकने निशाणा साधला आहे. 

स्टॅलिन यांनी आज द्रमुकचा जाहीरनामा जाहीर केला. यात पेट्रोल प्रतिलिटर 5 रुपये आणि डिझेल प्रतिलिटर 4 रुपयाने स्वस्त करण्याचे आश्वास देण्यात आले आहे. याचबरोबर स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरही शंभर रुपयांनी स्वस्त करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. देशात सध्या इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. यामुळे त्रस्त झालेल्या जनतेला दिलासा देणारा निर्णय सरकारने अद्याप घेतलेला नाही. यामुळे द्रमुकने हाच मुद्दा उचलून धरला आहे. 

जाहीरनाम्याबाबत बोलताना द्रमुकचे खासदार टी.शिवा म्हणाले की, सध्या इंधन दरवाढीचा मोठा बोजा जनतेवर  पडला आहे. केंद्र व राज्य सरकार इंधनावरील उत्पादन शुल्क व उपकर वाढवत आहेत. आम्ही सत्तेवर आल्यावर मात्र, इंधनावरील कर कमी करून इंधनाच्या किमती कमी करणार आहोत.  

द्रमुक लढवणार 186 जागा 

विधानसभा निवडणुकीसाठी स्टॅलिन यांनी १७३ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत विद्यमान आमदार व ज्येष्ठ नेत्यांसोबत नवीन चेहऱ्यांनाही संधी देण्यात आल्याचे दिसत आहे. माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधींचे वारसदार असलेले स्टॅलिन हे पुत्रासह मैदानात उतरले आहेत. स्टॅलिन हे कोलातूर मतदारसंघातून उभे राहणार आहेत तर त्यांचे पुत्र व अभिनेते उदयनिधी हे प्रथमच राजकीय आखाड्यात उतरत आहेत. ते चेपॉक-ट्रिप्लीकेनमधून मैदानात उतरत आहेत. 

विधानसभेच्या एकूण 234 पैकी 186 जागा द्रमुक लढवणार आहे. घराणेशाहीचा आरोप होण्याची भीती असल्याने उदयनिधी यांच्या उमेदवारीवर बराच खल सुरू होता. अनेक नेत्यांनी उदयनिधींना उमेदवारी देण्याची मागणी केली होती. मात्र, याबाबत खुद्द स्टॅलिनच साशंक होते. कारण विरोधक घराणेशाहीचा मुद्दा उचलून पक्षाला लक्ष्य करण्याची भीती होती. अखेर स्टॅलिन यांनी पुत्राला संधी देण्याचा निर्णय घेतला. मागील काळापासून उदयनिधी हे आक्रमकपणे प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. पक्षाची युवा आघाडीची जबाबदारीही त्यांच्यावरच आहे.  

द्रमुकने काँग्रेसला 25 जागा दिल्या असून, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, विदुथलाई चिरुथैगल काची आणि एमडीएमके या पक्षांना प्रत्येकी सहा जागा देण्यात आल्या आहेत. याचबरोबर कोगुंनाडू मक्कल देसिया काची या संघटनेला तीन जागा देण्यात आल्या आहेत. 

सत्ताधारी अण्णाद्रमुक पक्ष १७३ जागा लढवणार आहे. अण्णाद्रमकने भाजपला 20 जागा तर पट्टाली मक्कल काची (पीएमके) 23 जागा दिल्या आहेत. राज्यात उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून १९ मार्चपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. मतदान एकाच टप्प्यात ६ एप्रिलला होणार आहे. 

ओपिनियन पोलमध्ये द्रमुककडे कल 
राज्यात सत्ताधारी अण्णाद्रमुक आणि विरोधी पक्ष असलेल्या द्रमुकमध्ये थेट लढत आहे. आता टाईम्स नाऊ-सी-व्होटरने केलेल्या ओपिनियन पोलमध्ये (जनमत चाचणी) अण्णाद्रमुक आघाडीचा पराभव करुन द्रमुक आघाडी 158 जागा मिळवून सत्ता स्थापन करेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

जनमत चाचणीनुसार, अण्णाद्रमुकच्या जागांमध्ये मोठी घसरण होईल. मुख्यमंत्री एडापड्डी पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखाली अण्णाद्रमुकला केवळ 65 जागा मिळतील. मागील विधानसभा निवडणुकीत अण्णाद्रमुकला 136 जागा मिळाल्या होत्या. द्रमुकचे प्रमुख एम.के.स्टॅलिन यांच्या नावाला मुख्यमंत्रिपदासाठी सर्वाधिक पसंती मिळाली आहे. सुमारे 28 टक्के जनतेने त्यांच्या नावाला पसंती दिली आहे. याचवेळी मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्या नावाला 31 टक्के आणि मक्कल निधी मय्यम पक्षाचे प्रमुख व ज्येष्ठ अभिनेते कमल हसन यांनी केवळ 7.4 टक्के नागरिकांनी पसंती दिली आहे.  

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com