जावयाच्या घरावर छापे पडल्याने संतापलेले सासरे म्हणाले, मी एम.के.स्टॅलिन आहे!

निवडणूक चार दिवसांवर आलेली असताना द्रमुकचे प्रमुख एम.के.स्टॅलिन यांच्या जावयाच्या घरावर प्राप्तिकर विभागाने छापे मारले.
dmk chief m k stalin warns prime minister narendra modi and bjp
dmk chief m k stalin warns prime minister narendra modi and bjp

चेन्नई : तमिळनाडू विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातील वातावरण तापले आहे. निवडणूक चार दिवसांवर आलेली असताना आज द्रमुकचे प्रमुख एम.के.स्टॅलिन यांच्या जावयाच्या घरावर प्राप्तिकर विभागाने छापे मारले. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या द्रमुकने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. स्टॅलिन यांनी या प्रकरणी राज्य आणि केंद्र सरकारसह थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान दिले आहे. 

प्राप्तिकर विभागाने आज सकाळी चेन्नईत आठ ठिकाणी छापे मारले. यात स्टॅलिन यांची मुलगी सेंथामाराई आणि जावई सबारीसन यांच्याशी निगडित चार ठिकाणी छापे मारण्यात आले. प्राप्तिकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, स्टॅलिन यांच्या मुलीच्या तेनायमपेट आणि नीलनगराई येथील घरांवर छापे मारण्यात आले. स्टॅलिन यांचे जावई सबारीसन यांच्याशी निगडित अनेक ठिकाणीही छापे मारण्यात आले. निवडणूक प्रचारासाठी मोठी रोख रक्कम ठेवण्यात आल्याच्या संशयावरुन ही कारवाई करण्यात आली. 

सबारीसन यांचे सहकारी कार्तिक आणि बाला यांच्या घरावरही छापे मारण्यात आले. द्रमुकचे अण्णानगरमधील उमेदवारांचा कार्तिक हा मुलगा आहे. सबारीसन हे द्रमुकचे व्यूहरचनाकार आणि स्टॅलिन यांचे सल्लागार आहेत. यामुळे त्यांच्यावरील कारवाईने सर्वांनाच धक्का बसला आहे. या कारवाईची माहिती मिळाल्यानंतर द्रमुकचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सबारीसन यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या घरासमोर जमा झाले होते. यामुळे तेथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

याविषयी बोलताना स्टॅलिन म्हणाले की, अशा प्रकारांमुळेच जनता ६ एप्रिलला स्पष्ट कौल देणार आहे. मी एम.के.स्टॅलिन आहे. पंतप्रधान मोदींना माहिती असायला हवे की आम्ही तुमच्यासमोर झुकण्यासाठी अण्णाद्रमुकचे नेते नाही आहोत. मी आज सकाळी त्रिचीवरुन चेन्नईत आल्यानंतर या कारवाईची माहिती मला मिळाली. मोदी सरकार हे राज्यातील अण्णाद्रमुक सरकारला वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे. मी मोदींना सांगू इच्छितो की, आमचा पक्ष द्रमुक आहे हे विसरु नका. मी कलैग्नार (ए.करुणानिधी) यांचा पुत्र असून, मी असल्या गोष्टींमुळे घाबरत नाही. 

तमिळनाडूत ६ एप्रिलला विधानसभा निवडणूक होत आहे. मतमोजणी आणि निकाल हे २ रोजी आहेत. राज्यात ६ कोटी २८ लाख २३ हजार ७४९ मतदार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. जनमत चाचण्यांचा कल द्रमुकच्या बाजूने असून, मुख्यमंत्रिपदासाठी स्टॅलिन यांच्या नावाला पसंती मिळत आहे. यामुळे सत्ताधारी अण्णाद्रमुक आणि भाजप आघाडीने निवडणुकीसाठी आणखी ताकद लावली आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com