मुंबई पोलीस आयुक्तांना बडतर्फ करा, भातखळकरांचे पंतप्रधानांना पत्र   - Dismiss Commissioner of Police Paramvir Singh   | Politics Marathi News - Sarkarnama

मुंबई पोलीस आयुक्तांना बडतर्फ करा, भातखळकरांचे पंतप्रधानांना पत्र  

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 27 ऑगस्ट 2020

पोलीस आयुक्त परमविरसिंह हे आपल्या पदाचा गैरवापर करून याप्रकरणात कोणालातरी क्लिनचीट देण्याचा प्रयत्न करीत आहेत, असाही आरोप भातखळकर यांनी केला आहे.

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणातील एक संशयित अभिनेत्री आणि मुंबई पोलिस दलातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी हे सतत संपर्कात असल्याचे आढळून आले आहे. अशा स्थितीत मुंबईचे पोलीस आयुक्त परमविरसिंह व त्या विभागाचे डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांना बडतर्फ करावे, या मागणीसाठी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.

भातखळकर यांनी या पत्राची प्रत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही पाठवली आहे. पोलीस आयुक्त परमविरसिंह हे आपल्या पदाचा गैरवापर करून याप्रकरणात कोणालातरी क्लिनचीट देण्याचा प्रयत्न करीत आहेत, असाही आरोप भातखळकर यांनी केला आहे.

सुशांतसिंह प्रकरणात मुंबई पोलिसांना अद्याप कोणतेही ठोस धागेदोरे मिळाले नाहीत. त्यांनी आतापर्यंत एफआयआरही दाखल केला नाही. सर्वोच्च न्यायालयाने जरी या तपास प्रकरणात मुंबई पोलिसांवर कोणताही ठपका ठेवला नसला तरी तसे म्हणणे ही स्वतःची फसवणूक ठरेल. कारण वरिष्ठ पोलिसांनी पत्रकारांना मुलाखती देऊन सुशांत सिंह यांचे वैद्यकीय रेकॉर्ड जाहीर करणे ही असंवेदनशीलता आहे. तपास सुरू असताना पत्रकार व पोलीस यांच्यात संवाद होण्यावर न्यायालयाने लादलेल्या बंधनाचे देखील उल्लंघन करण्यात आले आहे, असेही भातखळकर यांनी दाखवून दिले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 50 साक्षीदार तपासले आहेत. याचा अर्थ सुशांत सिंहच्या आत्महत्येच्या कारणांच्या पलिकडे पोलिस काहीतरी शोधत आहेत हेच यातून दिसून येते. एका अदृश्य शक्तीने परमविर सिंह आणि पोलिस उपायुक्त यांना दिलेल्या आदेशानुसार सुशांतचा लॅपटॉप, मोबाइल जप्त करण्यात आला. सुशांत मृत्यूपूर्वी इंटरनेटवर, वेदनारहित मृत्यू इत्यादी बाबी शोधत होता, त्याचीही तपासणी झाली आहे, असेही त्यांनी पत्रात दाखवून दिले आहे.

या प्रकरणातील एका संशयित अभिनेत्रीचे मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याशी संभाषण झाले आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आलेल्या पाटणा पोलिसांना क्वारंटाइन करण्यात आले, यातून हेच दिसून येते की परमविर सिंह स्वतःच्या पदाचा गैरवापर करून कोणालातरी निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न करीत आहेत.

संबंधित लेख