दिशाचा मृतदेह कपड्याशिवाय नव्हे तर कपड्यासह सापडला; मुंबई पोलिसांचा खुलासा - disha salian body found without cloth is false says mumbai police dcp vishal thakur | Politics Marathi News - Sarkarnama

दिशाचा मृतदेह कपड्याशिवाय नव्हे तर कपड्यासह सापडला; मुंबई पोलिसांचा खुलासा

वृत्तसंस्था
रविवार, 9 ऑगस्ट 2020

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूच्या तपासावरुन गदारोळ सुरू आहे. यातच या प्रकरणाचा संबंध दिशा सॅलियन हिच्या आत्महत्येशी जोडून अनेक धक्कादायक आरोप केले जात आहेत.   

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानेही (सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे. आता या प्रकरणाचा संबंध सुशांतची माजी मॅनेजर दिशा सॅलियन हिच्या आत्महत्येशी जोडला जात आहे. या प्रकरणी अनेक धक्कादायक आरोप होऊ लागल्याने  मुंबई पोलिसांनी अखेर याबाबत खुलासा  करावा लागला आहे. 

सुशांतच्या मृत्यूप्रकरणी त्याचे पिता के.के.सिंह पाटण्यातील राजीवनगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. यानंतर सुशांतच्या मृत्यूच्या तपासावरून महाराष्ट्र आणि बिहार सरकार एकमेकांविरोधात उभे राहिल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दोन राज्यांचे पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असताना यात सक्त वसुली संचालनालयानेही (ईडी) उडी घेतली आहे. सुशांतचा मृत्यू आणि आर्थिक अनियमतिताप्रकरणी ईडीने रिया चक्रवर्ती हिच्यासह पाच जणांवर करचुकवेगिरी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. 

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) या प्रकरणी रिया चक्रवर्ती, तिचे पिता इंद्रजित, आई संध्या, भाऊ शोविक, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युएल मिरांडा आणि बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी यांचा समावेश आहे. बिहार पोलिसांकडून या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे सीबीआयने जप्त केली आहेत. ईडीने आधी रियाचे चार्टर्ड अकाउंटंट  रितेश शाह आणि संदीप श्रीधर यांची चौकशी केली होती. तसेच, सॅम्युएल मिरांडा याचीही चौकशी केली होती. काल ईडीने या प्रकरणी रिया, शोविक यांची चौकशी केली होती. 

सुशांतच्या मृत्यूचा संबंध आता त्याची माजी मॅनेजर दिशा सॅलियन हिच्या आत्महत्येशी जोडला जात आहे. दिशा हिने 8 जूनला आत्महत्या केली होती. आता याबाबत अनेक आरोप होत आहेत. दिशा हिचा मृत्यू झाला त्यावेळी तिच्या अंगावर कपडेच नव्हता, असा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. यासाठी आधार म्हणून तिचा शवविच्छेदन अहवालही सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. 

यावर मुंबईचे पोलिसांनी खुलासा केला आहे. पोलीस उपायुक्त (झोन 11) विशाल ठाकूर म्हणाले की, दिशाचा मृतदेह कपड्याशिवाय सापडला हा दावा खोटा आहे. घटना घडल्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी पोचले होते. तिच्या पालकांसमोरच मृतदेहाच्या पंचनामा करण्यात आला. तिने शेवटचा कॉल तिची मैत्रीण अंकिता हिला केला होता. तिचा जबाब पोलिसांनी नोंदवला असून, आणखी 20 ते 25 जणांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत. 

सुशांत याने 14 जूनला मुंबईतील घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याने आत्महत्येचे पाऊल नेमके कशामुळे उचलले याचा तपास मुंबई पोलिस करीत आहेत. त्याच्या आत्महत्येमागे नैराश्याचे अथवा व्यावसायिक शत्रुत्वाचे कारण होते का, याचाही शोध मुंबई पोलीस घेत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत 56 जणांचे जबाब नोंदविले आहेत. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा यात समावेश आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख