रामविलास पासवान जेडीयूच्या पाठिंब्याशिवाय राज्यसभेवर गेले का? मोदींचा सवाल - did Ram Vilas Paswan get elected to the Rajya Sabha without JDU support asks sushil kumar modi | Politics Marathi News - Sarkarnama

रामविलास पासवान जेडीयूच्या पाठिंब्याशिवाय राज्यसभेवर गेले का? मोदींचा सवाल

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 ऑक्टोबर 2020

बिहारमधील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. महाआघाडी आणि एनडीएचे जागावाटप जाहीर झाले असून, या आघाड्यांमधील बिघाडी समोर येत आहे. 

नवी दिल्ली : बिहारमधील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचे जागावाटप आज जाहीर झाले. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाला (जेडीयू) 122 जागा आणि भाजपला 121 जागा मिळाल्या आहेत. एनडीतून केंद्रीय रामविलास पासवान यांचा लोक जनशक्ती पक्षाने (एलजेपी) बाहेर पडला आहे. यावरुन एलजेपीचे अध्यक्ष चिराग पासवान यांना भाजपने लक्ष्य केले आहे. 

कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे बिहारमधील विधानसभा निवडणूक राजकीय पक्षांच्या व्हर्च्युअल प्रचारामुळे गाजणार आहे. बिहार विधानसभेची मुदत २९ नोव्हेंबरला संपत आहे. एकूण तीन टप्प्यांत ही निवडणूक होत आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला होणार असून, यात ७१ मतदारसंघ आहेत. दुसरा टप्पा  ३ नोव्हेंबरला असून, यात ९४ मतदारसंघ आहेत. तिसरा टप्पा ७ नोव्हेंबर असून, यात ७८ मतदारसंघ आहेत. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत.  

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आता स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत आरजेडी हा काँग्रेसला सोबत घेऊन महाआघाडीचे नेतृत्व करत आहे. याचवेळी एनडीएमधून लोक जनशक्ती पक्ष (एलजेपी) बाहेर पडला आहे. भाजपने मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाला पाठिंबा देऊन एलजेपीचे अध्यक्ष चिराग पासवान यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे. 

चिराग पासवान यांनी जास्त जागा मिळाव्यात म्हणून आग्रही भूमिका घेतली होती. त्यांच्या या भूमिकेमुळे एनडीएचे जागावाटप लांबले होते. पक्षाने राष्ट्रीय स्तर आणि लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. परंतु, बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पातळीवर जेडीयूसोबत वैचारिक मतभेद असल्याचे कारण देत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.  

याविषयी बोलताना भाजप नेते व बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी चिराग पासवान यांना लक्ष्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, नितीशकुमार हेच आमचे मुख्यमंत्री असतील असे आम्ही निर्विवादपणे जाहीर केले आहे. निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात यावर हे अवलंबून असणार नाही. मी माझे काम करण्यावर विश्वास ठेवतो. काही जण दुसरे काहीबाही बोलत असतील तर त्यांनी तसे बोलावे. मी त्याला महत्व देत नाही. 

जेडीयूकडून सहकारी पक्षांना चांगली वागणूक दिली जात नाही, असा आरोप चिराग यांनी केला आहे. यावर मोदी म्हणाले की, रामविलास पासवान हे जेडीयूच्या पाठिंब्याशिवाय राज्यसभेवर निवडून गेले का? 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख