कोरोनाबाधितांसाठी 'व्हायराफिन' ठरणार आशेचा किरण; झायडस कॅडिलाच्या औषधाला परवानगी - dgci has approved emergency use for Zydus Cadila Virafin | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

कोरोनाबाधितांसाठी 'व्हायराफिन' ठरणार आशेचा किरण; झायडस कॅडिलाच्या औषधाला परवानगी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला आहे. मागील 24 तासांत 2 हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. 

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला आहे. मागील 24 तासांत 2 हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील दररोजची रुग्णसंख्या आता 3 लाखांवर गेली आहे. या पार्श्वभूमीवर झायडस कॅडिला कंपनीच्या व्हायराफिन या औषधाच्या आपत्कालीन वापराला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. या औषधाच्या वापरामुळे रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागण्याची शक्यता कमी होत असून, त्यांची प्रकृती लवकर सुधारत आहे.  

व्हायराफिन हे पिगीलेटेड इंटरेफेरॉन अल्फा-2बी औषध आहे. कोरोना रुग्णांसाठी याच्या आपत्कालीन वापरास भारतीय औषध महानियंत्रकांनी परवानगी दिली आहे. हे औषध संसर्ग झाल्यानंतर सुरवातीला दिल्यानंतर कोरोनाबाधित व्यक्तीमधील विषाणूचे प्रमाण कमी होते. यामुळे सुरवातीच्या काळातच रुग्णाला रुग्णालयात दाखल व्हावे लागण्याची शक्यता कमी होते. तसेच, रुग्ण लवकर बरे होण्यास मदत होते. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर व्हायराफिन उपलब्ध होणार आहे. 

या औषधाची देशात 20 ते 25 केंद्रात चाचणी करण्यात आली. व्हायराफिन घेणाऱ्या रुग्णांना ऑक्सिजन देण्याची गरज कमी लागते. कोरोना रुग्णांमध्ये श्वसन यंत्रणा निकामी होण्याचे प्रकार घडतात. हे औषध नेमके तेच रोखत असल्यामुळे कोरोना रुग्ण रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण या औषधामुळे कमी होईल. इतर प्रकारच्या विषाणू संसर्गावरही हे औषध परिणामकारक आहे, असे झायडस कॅडिला कंपनीने म्हटले आहे. 

रुग्णसंख्या वाढीचा वेग चिंताजनक 
देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 3 लाख 32 हजार नवीन रुग्ण सापडले असून, 2 हजार 263 जणांचा मृत्यू झाला आहे. जगातील कोणत्याही देशात आतापर्यंत एका दिवसांत नोंदवण्यात आले नाहीत तेवढे रुग्ण भारताने सलग दोन दिवस नोंदवले आहेत. यामुळे देशातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे चित्र आहे. 

देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 1 कोटी 62 लाख 63 हजार 695 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 1 लाख 86 हजार 657 झाली आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत कोरोनाचे नवीन 3 लाख 32 हजार 730 रुग्ण सापडले, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख