राज्यसभेची पडद्यामागील गोष्ट : फडणवीसांची खेळी अन् 11 आमदारांच्या मतांचे गुपित

Devendra Fadnavis | Rajya Sabha | : भाजपने महाविकास आघाडीची ११ मत फोडली.
 Devendra Fadanvis
Devendra FadanvisSarkarnama

आज पहाटे राज्यसभेच्या 6 जागांचा निकाल जाहीर झाला. यात भाजपने तिसरी आणि धोक्यातील जागा खेचून आणतं शिवसेनेला मोठा धक्का दिला. खरंतरं कागदोपत्री हा सामना शिवसेनेच्या बाजूने होता. कारण आकडेवारी बघितली तर विजयासाठीच्या 42 मतांचा सुरक्षित कोटा बाजूला ठेवून शिवसेनेला दुसऱ्या जागेसाठी लागणाऱ्या 42 मतांसाठी शिवसेनेकडे 13 मत अतिरिक्त होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे 9 आणि काँग्रेसकडे 2 मत अतिरिक्त होती. म्हणजे तीन पक्षांची 24 मत अधिकृतरित्या संजय पवार यांना मिळणार होती.

आता प्रश्न होता वरच्या 17 मतांचा. या 17 मतांसाठी शिवसेनेने मागील काही रात्रींचा अक्षरशः दिवस केला होता. रिसॉर्ट पॉलिटीक्स, कोट्यावधींचा चुराडा, आरोप-प्रत्यारोप, गाठी-भेटी, बैठका सुरु होत्या. विधानसभेतील अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या 29 आमदारांपैकी किमान 22 मत महाविकास आघाडीसोबत असल्याचा दावा करण्यात येत होता. MIM वगळता महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेल्या आमदारांची संख्या 20 होती. त्यापैकी किमान 19 मत मिळतील असा विश्वास व्यक्त करण्यात येत होता. अखेरच्या क्षणी MIM ने देखील कॉंग्रेसला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे सर्वच्या सर्व 22 मत आपल्या बाजूने वळवण्यात 'मविआ'ला यश मिळालं.

मात्र प्रत्यक्षात निकाल जाहीर झाला तेव्हा मैदानावर सामना फिरला होता. 9 तासांच्या प्रचंड सस्पेन्सनंतर शिवसेनेचं 1 मत बाद झालं आणि मतमोजणी सुरु झाली. मतमोजणी सुरु झाल्यानंतर काही वेळातच पहिली फेरी झाली आणि निकाल हाती आला. अपेक्षेप्रमाणे निकाल होते, 5 जणांचा विजय झाला होता. तर सहाव्या जागेसाठी चुरस रंगणार होती. पण यात भाजपच्या उमेदवारांना मिळालेली मत भुवया उंचावणारी आणि तणाव वाढवणारी होती. संजय राऊतांच्या विजयानंतर जल्लोष करणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची धनंजय महाडिकांना मिळालेली मत ऐकल्यांनंतर तंतरली होती.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जयंत पाटील आणि विजयी उमेदवार प्रफुल्ल पटेल यांनाही नेमकं काय झालं आहे हे लक्षात आले होते. निकाल जाहीर झाल्यानंतर दोघांनीही माध्यमांना प्रतिक्रिया दिली पण ती खूपच संयत होती. दोघांच्याही चेहऱ्यावर तणाव स्पष्ट जाणवत होता. सावरण्यासाठी ते म्हणाले, आतमध्ये मोजणी सुरु आहे, दुसऱ्या फेरीत संजय पवार विजयी होतील, पण काही तरी चुकलं असल्याचं त्यांच्या लक्षात आलं होतं.

धनंजय महाडिक यांच्या मतांमध्ये भाजपकडून चाणाक्ष खेळी खेळल्याचे स्पष्ट दिसून येत होती. महाडिकांना पहिल्या पसंतीची तब्बल 27 मत होती. म्हणजे भाजपच्या स्वतःच्या 106, त्यांना पाठिंबा दिलेल्या 6 आणि मनसे 1 अशा 113 आमदारांशिवाय 10 मत जास्त होती. त्यामुळे महाविकास आघाडीच्या गोटातील 10 मत भाजपच्या उमेदवाराला गेल्याचे स्पष्ट दिसत होते. महाडिक यांनी इथेच पहिला डाव जिंकला होता. आता विजय ठरणार होता दुसऱ्या पसंतीच्या मतांवर.

भाजपच्या पहिल्या पसंतीच्या दोन उमेदवारांना 48 आणि 48 मत होती. नियमानुसार इतर उमेदवारांपेक्षा जास्त सरप्लस मत असल्यामुळे भाजपच्या तिसऱ्या उमेदवाराची दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी आधी होणार होती आणि इथेच भाजपने बाजी मारली होती. सोप्या भाषेत सांगायच तर आवश्यक 41 मतांचा कोटा बाजूला ठेवून गोयल आणि बोंडे यांच्या मतपत्रिकेवर दुसरा पसंतीक्रम महाडिक असल्यामुळे त्यांची सरप्लस 7 आणि 7 अशी 14 मत महाडिकांना ट्रान्सफर झाली आणि 27 + 14 = 41 मतांचा कोटा पूर्ण करत ते विजयी झाले.

महाविकास आघाडीचे कुठे चुकले?

सुरुवातील महाविकास आघाडीने आपला मतांचा कोटा अगदी सुरक्षित रित्या वापरण्याची रणनिती आखली होती. त्यानुसार तिन्ही पक्षांच्या 42 आमदारांनी मतदान केले. जे की आपल्या पक्षाच्या मुख्य उमेदवारांना होते. दुपारनंतरच्या सत्रात तिन्ही पक्षांची अतिरिक्त 24 मत ही अधिकृतरित्या संजय पवार यांना दिली गेली. निकाल लागला त्यावेळी संजय राऊत यांना 41 मत होती. सुहास कांदे यांच्या रुपातील त्यांचे एक मत बाद झाले होते.

तर प्रफुल्ल पटेल यांना 43 मत होती. शरद पवार यांनी सांगितल्याप्रमाणे हे अतिरिक्त मत त्यांना भाजपप्रणित आघाडीमधील आमदाराचे आले होते. त्यामुळे या अतिरिक्त मताचा फायदा संजय पवार यांना होणार नव्हता. तर कॉंग्रेसला मिळालेली मत 44 होती. यात 2 मत MIM ची असण्याची शक्यता आहे.

संजय पवार यांना पहिल्या पसंतीची 33 मत मिळाली. म्हणजे तीन पक्षाची अधिकृत 24 आणि इतर 9 मत त्यांना मिळाली. याचा अर्थ स्पष्ट आहे की ज्या 22 मतांच्या जोरावर शिवसेना आणि महाविकास आघाडी विजयाचा दावा करत होती त्यापैकी त्यांना केवळ 11 मत मिळाली. यात शिवसेनेला 9 आणि काँग्रेसला 2 मत मिळाली. म्हणजे महाविकास आघाडीसोबत असलेल्या 11 आमदारांनी भाजपला मदत केली.

महाविकास आघाडीला 9 अपक्ष, एमआयएम-2, समाजवादी पार्टी- 2, बहुजन विकास आघाडी- 3, प्रहार - 2, माकप- 1, स्वाभिमानी संघटना- 1, शेकाप- 1, क्रांतीकारी शेतकरी पक्ष - 1 असे मिळून 22 आमदारांनी पाठिंबा जाहीर केला होता. मात्र यापैकी केवळ 11 जणांनीच आघाडीला मतदान केले आहे. तर अन्य 11 जणांनी भाजपच्या उमेदवाराला मतदान केले आहे. याचाच फटका संजय पवार यांना बसला आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्येक डाव यशस्वी :

इथे अजून एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे भाजपप्रणित आघाडीमधील एक मत फुटणार याची कल्पना भाजप नेतृत्व किंवा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना बहुदा आधीच आली असावी. त्यामुळे महाविकास आघाडीकडील 11 मतांची तजबीज त्यांनी आधीच करुन ठेवली होती. यात त्यांनी अगदी उमेदवार उभा करण्यापासून ते निवडून आणण्यापर्यंत टाकलेला प्रत्येक डाव यशस्वी होत गेला.

सोबत देवेंद्र फडणवीस यांनी विजयानंतर माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया त्यांचे नियोजन किती सुक्ष्म होते हे सांगणारे होती. फडणवीस म्हणाले, जरी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाची परवानगी मिळाली असती तरी आम्हीच विजयी झालो असतो. याचा अर्थ 42 मतांचा कोटा झाला असता तरी त्यांनी त्याची तजबीज केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com