नारायण राणेंची पाठराखण करायला फडणवीस सरसावले!

'सीएम, बीएम गेला उडत' असं राणे म्हणाले होते.
नारायण राणेंची पाठराखण करायला फडणवीस सरसावले!
Devendra Fadnavis supported Narayan Ranes comment about CM

कोल्हापूर : कोकणातील पुरस्थितीच्या पाहणी दौऱ्यादरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यावरून अनेकांनी टीका केली आहे. 'सीएम, बीएम गेला उडत' असं राणे म्हणाले होते. तसेच जिल्हाधिकाऱ्यांवरही ते संतापल्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. यावरून राणेंवर होत असलेल्या टीकेला उत्तर देत फडणवीस यांनी त्यांची पाठराखण केली आहे. (Devendra Fadnavis supported Narayan Ranes comment about CM)

कोल्हापुर जिल्ह्यातील पुरस्थितीची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले,  मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री एकाच दौऱ्यावर असतील आणि जिल्हाधिकारी मुख्यमंत्र्यांकडे गेले असल्यास अप्पर जिल्हाधिकारी केंद्रीय मंत्र्यांसोबत हवेत. रत्नागिरी दौऱ्यात असे पाहायला मिळाले नाही. मुख्यमंत्र्यांचा दौरा पूर्ण झाल्यानंतर नारायण राणे तिथे आले होते. त्यांच्या दौऱ्यादरम्यान चिपळूणमध्ये नागरिकांचा आक्रोश सुरू होता. यादरम्यान काही अधिकारी कार्यालयात बसून होते. पण केंद्रीय मंत्री आलेले असताना ते तिथे आले नाहीत, असे फडणवीस यांनी नमूद केलं.

पुरस्थितीविषयी बोलताना फडणवीस म्हणाले, नदीकाठावर पूरसंरक्षक भिंत चीनच्या भिंतीसारखी बांधता येणार नाही. पूरसंरक्षक भिंती घालणे सरसकट शक्य नाही. अनेक पर्यायांपैकी हा एक पर्याय असेल. तोही ठराविक भागापुरताच. सध्या वीस वर्षांपूर्वीची सरसकट बांधकामे आता काढणे शक्य होणार नाही. २००५, २०१९ आणि आजची पश्‍चिम महाराष्ट्राची परिस्थिती पाहता आता कायमस्वरूपी उपाययोजना कराव्या लागतील. मुख्यमंत्री आणि मी भेटलो त्यावेळी याच मुद्यावर बोललो. याबाब ते बैठक बोलावणार असून आम्ही बैठकीत जाऊ, असे फडणवीस यांनी सांगितले. 

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांचा शुक्रवारी एकाच दिवशी पुरग्रस्त दौरा झाला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधताना फडणवीसांना टोला लगावला. त्यांचे नाव न घेता ठाकरे यांनी आपण पॅकेज घोषित करणारे नसून मदत करणारा मुख्यमंत्री आहे, असे म्हटलं. सवंग लोकप्रियतेसाठी घोषणा करणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

पुरस्थितीवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील पाणी अजूनही ओसरलेले नाही. पुरबाधित क्षेत्र म्हणून रेड आणि ब्लू झोन तयार केले असले तरीही लोकांच्या जिवावर बेतणाऱ्या अशा झोनमध्ये आता बांधकामांना परवानगी देण्याबाबत विचार केला जाईल. अशा झोनमध्ये अतिक्रमण झाले आहे. सरकार अशी बांधकामे आणि नाहक जीव गमावणाऱ्यांकडे पाहू शकत नाही. नागरिकांचे पुनर्वसन केले पाहिजे. भविष्यातील पूर रोखण्यासाठी कठोर निर्णय घेतले जातील. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in