कृषी कायद्यांचे प्राणपणाने समर्थन करणारे फडणवीस अन् बोंडे शांतच!

पंतप्रधान मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे.
कृषी कायद्यांचे प्राणपणाने समर्थन करणारे फडणवीस अन् बोंडे शांतच!
Devendra Fadnavis, Anil BondeSarkarnama

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी तीन कृषी कायदे (Farm Laws) मागे घेण्याची घोषणा शुक्रवारी सकाळी केली. त्यानंतर भाजपकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit shah), पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा (J P Nadda), प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांच्या आणखी काही नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या. पण कृषी कायद्यांचे प्राणपणाने समर्थन करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजप किसान मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. अनिल बोंडे (Anil Bonde) शांतच आहेत. विरोधकांनी नेमकं त्यावरच बोट ठेवलं आहे.

मागील वर्षी केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मंजूर केल्यानंतर भाजपच्या राज्यभरातील नेत्यांनी त्याचे जोरदार समर्थन केले होते. या कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू झाल्यानंतर भाजपने राज्यभरात समर्थनार्थ रॅली काढल्या. ठिकठिकाणी शेतकरी मेळावे घेतले. यामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच भाजप किसान मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. अनिल बोंडे आघाडीवर होते.

Devendra Fadnavis, Anil Bonde
कमी पडल्याची कबुली देत पंतप्रधान मोदींनी मागितली देशाची माफी

भाजपच्या बहुतेक नेत्यांकडून ट्विटरवरून कायद्यांच्या समर्थनार्थ व शेतकरी आंदोलनाच्या विरोधात ट्विटचा भडिमार सुरू होता. मोदींच्या कोणत्याही घोषणेनंतर त्यांच्याकडून ट्विटरवर प्रतिक्रिया टाकण्यासाठी चढाओढ लागलेली असते. पण आज पंतप्रधान मोदींनी घोषणा केल्यानंतर फडणवीसांसह बोंडे यांचे दुपारी चार वाजेपर्यंत त्यांनी ट्विटरवर आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. फडणवीस यांनी केवळ यांचे ट्विट रिट्विट केले आहे. तर बोंडे यांचा ट्विटरवर चकार शब्दही नाही. चंद्रकांत पाटील यांनीही दुपारपर्यंत केवळ शहा आणि नड्डांचे ट्विट रिट्विट केले होते. दुपारी साडे तीन वाजता त्यांची वैयक्तिक भूमिका ट्विटवर पडली.

या नेत्यांच्या ट्विटरवरील शांततेवर काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. सावंत यांनी ट्विट करत म्हटले आहे की, फडणवीस जी आणि चंद्रकांत दादांसहित राज्यातील भाजपा नेत्यांची कोंडी झाली आहे. ज्या तीन काळ्या कृषी कायद्यांचे छाती पिटून समर्थन केले, मोदीजींचे गोडवे गायले, ते काळे कायदे परत घेण्याच्या मोदींच्या निर्णयाचे स्वागत कसे करावे? त्यामुळे ट्विटरवर शांतता दिसते, असा टोला सावंत यांनी लगावला आहे.

महाविकास आघाडीतील नेत्यांनी मोदींच्या घोषणेचे कौतुक करताना देर आये दुरूस्त आये, असं म्हणत टीकाही केली आहे. शेकडो शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर मोदी सरकारला जाग आली. मागील वर्षभरापासून हे शेतकरी आंदोलन करत होते. त्यांना दहशतवादी, पाकिस्तानी म्हटले गेले. आताच मोदींना शेतकऱ्यांचा कळवळा कसा आला, असा सवाल विरोधकांकडून गेला जात आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in