अजित पवारांची भेट अन् शिवेंद्रसिंहराजेंच्या सीमोल्लंघनाची चर्चा... - deputy chief minister ajit pawar met bjp mla shivendra raje bhosale | Politics Marathi News - Sarkarnama

अजित पवारांची भेट अन् शिवेंद्रसिंहराजेंच्या सीमोल्लंघनाची चर्चा...

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020

साताऱ्यातील भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची आज भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. 

सातारा : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेशाची जोरदार चर्चा राज्यभरात सुरू आहे. आता साताऱ्याचे भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतल्याचे समोर आले आहे. पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात शिवेंद्रसिंहराजे आणि अजित पवार यांच्यात आज भेट झाली. या बैठकीने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले असून, शिवेंद्रसिंहराजेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे.  

शिवेंद्रसिंहराजे अचानक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला आल्याने राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र, ही बैठक कास धरणाची उंची वाढविण्यासंदर्भातल्या पुढील कार्यवाहीशी निगडित होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. शिवेंद्रसिंहराजे आणि अजित पवारांमध्ये सुमारे तासभर बैठक झाली. या बैठकीत राजकीय विषयांवर चर्चा झाल्याची माहिती काही कार्यकर्त्यांनी दिली. मात्र, ही चर्चा कोणत्या दिशेने पुढे जाणार हे अद्याप स्पष्ट नाही. असे असताना ही भेट वैयक्तिक कारणासाठी असल्याचे शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.  

सातारा हद्दवाढीसंदर्भात शिवेंद्रसिंहराजे यांनी अजित पवारांची यापूर्वी भेट घेतली होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री पवारांनीही सातारा हद्दवाढ करुन शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्याला यश मिळवून दिले होते. शिवेंद्रसिंहराजेंनी कास धरणाच्या उंचीबाबत वारंवार पाठपुरावा केला आहे, त्याच अनुषंगाने ही बैठक असल्याचे बोलले जात आहे. 

याबाबत माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी राजकीय चर्चा खोडून काढल्या. ते म्हणाले की, शिवेंद्रसिंहराजे हे विकास कामासाठी भेटून गेले. या अशा भेटी होत राहतात. त्यामुळे असा काही अर्थ काढू नका. त्यात काहीही काळबेरे नाही. यापूर्वीही शिवेंद्रसिंहराजे आणि माझी भेट झाली होती. 

राज्यातील अतिवृष्टीबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार 10 ते 17 ऑक्टोबरपर्यंत अतिवृष्टीची शक्यता होती. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात हा अंदाज खरा ठरला आहे. त्याशिवाय पुढील दोन दिवस अशाचप्रकारे पाऊस पडू शकतो. मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या (एनडीआरएफ) बोटी किंवा मदत कार्य पोहोचवणे हे काम सुरु आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख