अखेर मोदी सरकार झुकले...शेतकरी दिल्लीत पोचलेच..!

कृषी कायद्यांच्या विरोधात रान पेटले असून, देशभरातील शेतकरी आंदोलनासाठी दिल्लीकडे कूच करीत आहेत. या शेतकऱ्यांना रोखणाऱ्या मोदी सरकारने अखेर माघार घेतली आहे.
delhi police finally allows protesting farmers to enter national capital
delhi police finally allows protesting farmers to enter national capital

नवी दिल्ली : कृषी कायद्यांना विरोध करीत दिल्लीकडे कूच करणाऱ्या हजारो आंदोलक शेतकऱ्यांना रोखण्यासाठी हरियाना व उत्तर प्रदेश पोलिसांनी आज प्रयत्न केले. पोलिसांचा हा प्रयत्न उधळून लावत हजारो शेतकरी आज दिल्लीच्या सिंघू व टीकरी सीमेवर दाखल झाले. तेथेही शेतकऱ्यांना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांचा अफाट फौजफाटा तैनात करण्यात आला होता. अखेर शेतकऱ्यांसमोर मोदी सरकार झुकले आणि त्यांना दिल्लीत प्रवेश देण्यात आला. 

दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांना रोखण्यासाठी प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तेथे सुरवातीला काटेरी तारांचे अडथळे होते. त्यानंतर दंगलग्रस्त भागासाठी तयार केलेल्या वज्र वाहनासह पोलिसांच्या व अग्निशामक दलाच्या गाड्यांच्या रांगा होत्या. हजारो सशस्त्र पोलिस व निमलष्करी जवान तैनात करण्यात आले होते. सातत्याने ड्रोनद्वारेही शेतकऱ्यांवर नजर ठेवण्यात येत होती. 

कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीत आंदोलन करण्यासाठी पंजाब, हरियानाचे शेतकरी राजधानीत जाण्यावर ठाम होते. पोलिसांनी दोन दिवसांपासून दिल्लीकडे जाणारे रस्ते अडवल्यामुळे सीमेवर मोठ्या संख्येने शेतकरी जमले. सिंघू सीमेवर दिल्ली पोलिसांनी तीन कड्यात बॅरिकेड उभारल्याने शेतकऱ्यांना पुढे जाताना अडचणी येत होत्या. सर्वांत पुढे काटेरी तारांचे आणि त्यानंतर बॅरिकेडप्रमाणे ट्रक आणि शेवटची कडी वॉटर कॅननची होती. कोणत्याही स्थितीत आंदोलक दिल्लीला जावू नये, यासाठी पोलिस खबरदारी घेत होते. 

सीमांची नाकाबंदी तीन राज्यांच्या पोलिसांनी केली होती. मात्र शेतकरी ट्रॅक्टरच्या मदतीने पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. शेतकऱ्यांवर लाठीमार, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडणे, पाण्याचा फवारा मारणे आदी प्रकार सुरू होते. तरीही मागे हटण्यास शेतकऱ्यांनी नकार दिला होता. अखेर केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांनी दिल्लीत येण्याची परवानगी दिली. शेतकऱ्यांना बुरारी मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी शेतकऱ्यांच्या नेत्यांना 3 डिसेंबरला चर्चेला बोलावले आहे. 

शेतकऱ्यांना दिल्लीच्या सिंघू सीमेवर रोखण्यात आले. शेतकऱ्यांनी दिल्लीला जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर आणले. मात्र त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. शेतकरी दिल्लीत जाण्यासाठी ठाम राहून तेथेच धरणे आंदोलन सुरू केले. तेथेच आंदोलकांसाठी स्वयंपाक सुरू केला. लोकशाहीत आंदोलन करण्याचा हक्क असून आम्ही शांततेच्या मार्गाने आमच्या मागण्या मांडत आहोत, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कोणत्याही स्थितीत दिल्लीत जाणारच, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. 

पानिपत येथे आजही दुसऱ्या दिवशी पोलिस आणि शेतकऱ्यांत संघर्ष झाला. शेतकऱ्यांनी बॅरिकेड तोडून दिल्लीकडे कूच केली. पंजाबच्या शेतकऱ्यांनीही दिल्लीकडे वाटचाल सुरूच ठेवली असून त्यांचाही हरियाना पोलिसांशी संघर्ष झाला आहे. पानिपतच्या सेक्टर २९ च्या पोलिस ठाण्याजवळ पोलिसांनी जेसीबी मशिन मागवल्या आणि रस्ते खोदले. त्यामुळे पोलिसांना चुकवत शेतकऱ्यांनी शिवा गावाजवळील महामार्गालगतच्या शेतातूनच मार्ग काढत दिल्लीकडे धाव घेतली. 

Edited by Sanjay Jadhav
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com