आयएनएक्स मीडिया प्रकरण : चिदंबरम पिता-पुत्रांविरोधातील खटल्याला उच्च न्यायालयाची स्थगिती - Delhi High Court stays trial court in INX media case against P Chidambaram | Politics Marathi News - Sarkarnama

आयएनएक्स मीडिया प्रकरण : चिदंबरम पिता-पुत्रांविरोधातील खटल्याला उच्च न्यायालयाची स्थगिती

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 मे 2021

आयएनएक्स मीडिया प्रकरणाच्या कनिष्ठ न्यायालयातील खटल्याच्या कामकाजाला दिल्ली उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. 

नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया (INX Media) प्रकरणाच्या कनिष्ठ न्यायालयातील खटल्याच्या कामकाजाला दिल्ली उच्च न्यायालयाने (High Court) स्थगिती दिली आहे. यात काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय अर्थमंत्री पी.चिदंबरम (P.Chidambaram), त्यांचे पुत्र खासदार कार्ती चिदंबरम (Karti Chidambaram) यांच्यासह इतर आरोपी आहेत. या प्रकरणी बाजू मांडण्याचा आदेशही सर्व आरोपींना उच्च न्यायालयाने दिला आहे. 

आयएनएक्स प्रकरणातील सर्व कागदपत्रे आरोपींना द्यावीत, असा आदेश कनिष्ठ न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) दिला होता. याला सीबीआयने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सुरेश कुमार कैत यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयातील या खटल्याच्या कामकाजास स्थगिती दिली आहे. 

हेही वाचा : कोरोनामुळे पालकांना गमावलेल्या मुलांना दरमहा पेन्शन अन् मोफत शिक्षण 

कनिष्ठ न्यायालयाने 5 मार्चला दिलेला आदेश रद्दबातल ठरवावा, अशी मागणी सीबीआयने उच्च न्यायालयाकडे केली होती. सीबीआयने या प्रकरणाची सर्व कागदपत्रे आरोपी आणि त्यांच्या वकिलांना दाखवावीत, असा हा आदेश होता. तपासादरम्यान सीबीआयने जमा केलेल्या सर्व कागदपत्रांचा यात समावेश होता. ही कागदपत्रे देण्यास सीबीआयने विरोध दर्शविला होता. 

आयएनएक्स मीडियाला परदेशातून 2007 मध्ये 305 कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. त्यावेळी चिदंबरम हे केंद्रीय अर्थमंत्री होते. परकी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने या व्यवहाराला मान्यता दिली होती. यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाल्याने सीबीआयने तपास सुरू केला होता. हा खटला आता सुरू आहे. 

त्यानंतर सक्त वसुली संचालनालयाने या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. परकी गुंतवणूक प्रोत्साहन मडंळाने आयएनक्स मीडियाला 305 कोटी रुपयांच्या परकी निधीसाठी परवानगी दिल्याचे हे प्रकरण होते. त्यावेळी चिदंबरम हे केंद्रीय अर्थमंत्री होते. सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे करचुकवेगिरी प्रतिबंधक कायद्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आयएनएक्स मीडियाला परवानगी देताना अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला होता. आयएनएक्स मीडियाच्या प्रवर्तक इंद्राणी मुखर्जी आणि त्यांचा पती पीटर मुखर्जी यांची सक्त वसुली संचालनालयाने चौकशी केली होती. त्यानंतर चिदंबरम तपास यंत्रणांच्या रडारवर आले. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख