मोठी बातमी : कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलांना दरमहा पेन्शन अन् मोफत शिक्षण - delhi government will give pension to childrens whose both parents died due to covid | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक

मोठी बातमी : कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलांना दरमहा पेन्शन अन् मोफत शिक्षण

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 मे 2021

देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढीचा वेग कमी झाला असली तरी मृत्यूचे आकडे विक्रमी पातळीवर पोचले आहेत. 

नवी दिल्ली : देशात कोरोनामुळे (Covid19) आतापर्यंत पावणेतीन लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. पालकांचा मृत्यू झाल्याने अनाथ होणाऱ्या मुलांची संख्याही लक्षणीय आहे. आता या मुलांची काळजी घेण्यासाठी दिल्लीतील आम आदमी पक्षाचे (AAP) सरकार पुढे आले आहे. अशा मुलांना दरमहा अडीच हजार रुपयांची पेन्शन देण्यात येईल, अशी घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejirwal) यांनी दिली आहे. 

मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, कोरोनात ज्या मुलांच्या दोन्ही पालकांचा मृत्यू झाला आहे अथवा आधी एका पालकाचा मृत्यू झाला होता आणि दुसऱ्या पालकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे अशांना पेन्शन देण्यात येणार आहे. या मुलांना त्यांच्या वयाच्या 25 वर्षांपर्यंत 2 हजार 500 रुपयांची पेन्शन दिली जाणार आहे. याचबरोबर या मुलांना मोफत शिक्षण दिले जाणार आहे. 

हेही वाचा : कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतलेले आयएमएचे माजी अध्यक्ष कोरोनाशी झुंज हरले 

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना 50 हजार रुपयांची नुकसान भरपाई दिली जाणार आहे. एखाद्या कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाला असल्यास त्याच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाईसोबत 2 हजार 500 रुपयांची पेन्शन दिली जाईल. पतीचा मृत्यू झाल्यास पत्नीला आणि पत्नीचा मृत्यू झाला असल्यास पतीला पेन्शन दिली जाईल. अविवाहित व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या पालकांना पेन्शन दिली जाईल, असे केजरीवाल यांनी नमूद केले.  

देशात 24 तासांत 4 हजार 329 मृत्यू 
देशात आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 2 लाख 63  हजार 533 नवीन रुग्ण सापडले असून, 4 हजार 329 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 2 कोटी 52 लाख 28 हजार 996 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 2 लाख 78 हजार 719 झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. रुग्णसंख्या कमी होत असून 21 एप्रिलनंतर कालपासून (ता.17 मे) रोजची रुग्णसंख्या 3 लाखांच्या खाली आली आहे. तरीही मृत्यूचा आकडा वाढत असून, याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. 

Edited by Sanjay Jadhav
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख