धक्कादायक : उत्तरकाशीमध्ये नदीत सोडले मृतदेह; कुत्री तोडताहेत लचके

देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली आहे. या काळात कोरोनाबाधितांचे मृतदेह नद्यांमध्ये सोडण्याचे प्रमाण वाढले आहे.
dead bodies found in Bhagirathi river in uttarakhand kedar ghat
dead bodies found in Bhagirathi river in uttarakhand kedar ghat

नवी दिल्ली : देशात कोरोना (Covid-19) संसर्गाची दुसरी लाट आली आहे. या काळात कोरोनाबाधितांचे मृतदेह (Dead Bodies) नद्यांमध्ये सोडण्याचे प्रमाण वाढले आहे. गंगेनंतर (Ganga) आता भागिरथी (Bhagirathi) नदीमध्ये अर्धवट जळालेले मृतदेह आता तरंगताना दिसू लागले आहेत. उत्तराखंडमधील (Uttarakhand) केदार घाट येथे नदीच्या काठावर आलेल्या मृतदेहांचे लचके कुत्री तोडताना दिसत आहेत. 

मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे भागिरथी नदीची पातळी वाढली आहे. यामुळे अनेक अर्धवट जळालेले मृतदेह नदीत वाहून येत आहेत. नदीच्या काठावर आलेल्या मृतदेहांचे लचके कुत्री तोडताना दिसत आहेत. स्थानिक नागरिकांना याची माहिती तातडीने जिल्हा प्रशासन आणि महापालिकेला दिली आहे. हे मृतदेह कोरोनाबाधितांचे असल्याचा संशय स्थानिक व्यक्त करीत आहेत. या सर्व प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. नागरिकांनी तक्रार करुनही महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने अद्याप कोणतेही पाऊल उचललेले नाही. 

दरम्यान, या विषयी महापालिकेचे अध्यक्ष रमेश सेमवाल यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, स्थानिक नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर केदार घाट येथे अर्धवट जळालेल्या मृतदेहांवर अंत्यसस्कार करण्यासाठी एक व्यक्ती तैनात करण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून येथे मृत्यू वाढले आहेत. काही जण व्यवस्थित अंत्यसंस्कार न करता अर्धवट जळालेले मृतदेह नदीत सोडतात. या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. 

याआधी उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात मृतदेह सोडण्यात आल्याचे प्रकार समोर आले होते. हे कोरोनाबाधितांचे मृतदेह होते, असा दावा करण्यात आला होता. यावरुन मोठा गदारोळ उडाला होता. अखेर केंद्र सरकारने या राज्यांना नद्यांत सोडलेल्या मृतदेहांची विल्हेवाट लावण्याचे निर्देश दिले होते. उत्तराखंडमध्ये काल 1 हजार 156 नवीन कोरोना रुग्ण सापडले असून, एकूण रुग्णसंख्या 3 लाख 29 हजार 494 आहे. राज्यात आतापर्यंत 6 हजार 452 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

देशात 24 तासांत 1 लाख 27 हजार रुग्ण 

देशात आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 1 लाख 27 हजार नवीन रुग्ण सापडले असून, 2 हजार 795 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 2 कोटी 81 लाख 75 हजार 44 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 3 लाख  31 हजार 895 झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशातील रुग्णसंख्या 25 मेपासून 2 लाखांच्या खाली आली आहे. आता कोरोना मृत्यूचा आकडाही 34 दिवसांत पहिल्यांदाच 3 हजारांखाली आला आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com