मुंबई : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. कोरोना या नव्या लाटेने राज्यात चिंताजनक स्थिती निर्माण झालेली आहे. यातच आता महाराष्ट्राच्या मंत्रालयातही कोरोनाचा कहर सुरू झाला आहे. मंत्रालयातील विविध विभागांतील तब्बल 35 अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे आज स्पष्ट झाले. यामुळे मंत्रालय प्रशासन हादरले आहे.
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पुढील सोमवारपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रालयातच कोरोनाचा कहर वाढू लागल्याने प्रशासन धास्तावले आहे. अशा प्रकारे मंत्रालयातील कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मंत्रालयात प्रवेशाची मोठी समस्या निर्माण झाली आहे.
मागील आठवड्यात महसूल विभागातील तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. आज तब्बल 23 कर्मचारी व अधिकाऱ्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली. यामुळे मंत्रालय प्रशासन व पोलिसांचे धाबे दणाणले आहेत. शिक्षण विभागातील 12 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. महसूल विभागात आज 2 उपसचिव, 4 अतिरिक्त सचिव, 3 कक्ष अधिकारी, 4 सहाय्यक कक्ष अधिकारी आणि 8 कारकून असे एकूण 23 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले.
मंत्रालयातील कोरोना रुग्णांत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. काही जणांचे अहवाल वरिष्ठांकडे यायचे आहेत. कोरोना लागण झालेल्यांपैकी बहुतांश कर्मचारी गुरुवारी कार्यालयात हजर होते. त्यांना शुक्रवारी त्रास जाणवू लागल्यानंतर चाचणी करण्यात आली. त्यात त्यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. दरम्यान, वरळीतील धर्मादाय आयुक्त कार्यालयातही एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
कोरोनाची लागण झालेल्या अधिकाऱ्यांचे कक्ष बंद करण्यात आले आहेत. मागील 2 ते 3 दिवसांपासून मंत्रालयातील विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित सापडले आहेत. मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांवर कोरोनाचा धोका टळेपर्यंत निर्बंध आणावेत, अशी मागणी महाराष्ट्र मंत्रालय अधिकारी संघटनेसह विविध मंत्रालयीन कर्मचारी संघटनांकडून करण्यात आली आहे.
Edited by Sanjay Jadhav

