धक्कादायक : कोझिकोड विमान दुर्घटनेतील मृतांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह

कोझिकोड विमान दुर्घटनेतील मृतांची संख्या 18 वर पोचली आहे. या प्रकरणी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने चौकशीचे निर्देश दिले आहेत.
covid19 positive found in kozhikode plane crash victims says kerala minister
covid19 positive found in kozhikode plane crash victims says kerala minister

कोझिकोड : एअर इंडिया एक्स्प्रेसचे दुबईहून आलेले विमान शुक्रवारी रात्री कोझिकोड आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असताना कोसळले. या विमानात 184 प्रवासी आणि 6 कर्मचारी असे एकूण 190 जण होते. प्रवाशांमध्ये दहा लहान मुलांचाही समावेश होता. या दुर्घटनेत विमानाचे दोन तुकडे झाले होते. या दुर्घटनेत दोन्ही वैमानिकांसह 18 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमधील एक जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 

एअर इंडिया एक्स्प्रेसचे दुबईहून आलेले आयएक्स 1344 हे विमान काल रात्री 7 वाजून 40 मिनिटांच्या सुमारात कोझिकोड विमानतळावर उतरत होते. मुसळधार पावसामुळे वैमानिकाला धावपट्टीचा अंदाज न आल्याने धावपट्टीच्या पुढे जाऊन विमान कोसळले, अशी माहिती एअर इंडिया एक्स्प्रेसच्या प्रवक्त्याने दिली. या दुर्घटनेत विमानाच्या दोन्ही वैमानिकांसह 18 जणांचा मृत्यू झाला आहे. 

अपघातात प्रवाशांचे जीव वाचविण्याचा प्रयत्न करणारे वैमानिक कॅप्टन दीपक साठे आणि कॅप्टन अखिलेश कुमार या दोघांचाही मृत्यू झाला. दीपक साठे हे फायटर पायलट होते. ते पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) 58 व्या तुकडीचे विद्यार्थी होते. वायू सेना अकादमीकडून 'स्वोर्ड ऑफ ऑनर' प्राप्त दीपक साठे यांनी मिग विमाने सर्वाधिक वेळा चालवली होती. या दोन्ही वैमानिकांनी आपला जीव गमावत अनेक प्रवाशांचे प्राण वाचविले आहेत. 

दुर्घटनाग्रस्त विमान हे वंदे भारत मोहिमेतील होते. केंद्र सरकारने कोरोना संकटाच्या काळात परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी ही मोहीम सुरू केली होती. परदेशातील भारतीयांना परत आणताना त्यांची कोरोना चाचणी करुन परत आणले जाते. मात्र, मृतांमधील एक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने या प्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. केरळचे मंत्री के.टी. जलील यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोझिकोड विमान दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमधील एकाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. 

या दुर्घटनेविषयी मल्लपुरमचे पोलीस अधीक्षक अब्दुल करीम म्हणाले की, या विमान दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेतील जखमींना रुग्णालयात हलविण्यासाठी मदत कार्य करण्यात आले आहे. ही दुर्घटना घडली त्यावेळी मुसळधार पाऊस पडत होता. पोलीस आणि अग्निशमन दलाकडून मदतकार्य वेगाने सुरू केले. एनडीआरएफचे पथकही घटनास्थळी पोचले होते. 

या प्रकरणी केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. त्यांनी पोलिसांनी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश दिल्या आहेत. याचबरोबर मदत कार्य वेगाने करण्याच्या सूचनाही केल्या आहेत. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा करुन स्थितीचा आढावा घेतला आहे. कोझिकोड आणि मल्लपुरमचे जिल्हाधिकारी आणि पोलीस महानिरीक्षक अशोक यादव घटनास्थळी पोचले आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींना सांगितले.  

याविषयी बोलताना राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे (एनडीआरएफ) महासंचालक एस.एन.प्रधान म्हणाले की, कोझिकोड विमानतळावर टेबलटॉप धावपट्टी आहे. या दुर्घटनेत काही प्रवासी जखमी झाले असून, काही जण बेशुद्ध पडले आहेत. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com