लसीकरण प्रमाणपत्रावरील मोदी झाले गायब अन् ममता अवतरल्या! - on covid vaccination certificate mamata banerjee instead of narendra modi | Politics Marathi News - Sarkarnama

लसीकरण प्रमाणपत्रावरील मोदी झाले गायब अन् ममता अवतरल्या!

वृत्तसंस्था
शनिवार, 5 जून 2021

लस टंचाईमुळे केंद्र आणि राज्ये एकमेकांवर आरोप करण्यात गुंतली आहेत. आता लसीकरण प्रमाणपत्रावरुन वाद निर्माण झाला आहे. 

नवी दिल्ली : देशात कोरोना (Covid-19) संसर्गाची दुसरी लाट आली असून, लसीकरणावर (Covid Vaccination) भर देण्यात आला आहे. असे असले तरी लस टंचाईमुळे केंद्र आणि राज्ये एकमेकांवर आरोप करण्यात गुंतली आहेत. आता लसीकरण प्रमाणपत्रावरुन वाद निर्माण झाला आहे. पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी लसीकरण प्रमाणपत्रावरील पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो काढून स्वत:चा फोटो लावला आहे.  

लस घेतल्यानंतर नागरिकांना लसीकरण प्रमाणपत्र मिळते. या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो होता. याला अनेकवेळा आक्षेप घेण्यात आला होता. आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी मोदींचा लसीकरण प्रमाणपत्रावरील फोटोच काढून टाकला आहे. त्याजागी ममतांनी स्वत:चा फोटो टाकला आहे. 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना देण्यात येणाऱ्या लसीकरण प्रमाणपत्रावर ममतांचा फोटो आहे. दरम्यान, याआधी काँग्रेसची सत्ता असलेल्या छत्तीसगडने लसीकरण प्रमाणपत्रावरील मोदींचा फोटो काढून टाकला होता. त्याजागी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचाही फोटो टाकण्यात आला होता. 

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीवेळीही लसीकरण प्रमाणपत्रावरील मोदींच्या फोटोला आक्षेप घेण्यात आला होता. विधानसभा निवडणुकीवेळी मोदींच्या फोटोबद्दल तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाकडेही तक्रार केली होती. परंतु, निवडणूक आयोगाने मोदींचा फोटो हटवण्यास नकार दिला होता. याचबरोबर मागील काही दिवसांपासून ममता बॅनर्जी आणि भाजपमध्ये जोरदार जुंपली आहे. याला पंतप्रधान मोदींचा यास चक्रीवादळाचा पाहणी दौरा कारणीभूत ठरला आहे. या दौऱ्यात ममतांनी मोदींना वाट पाहायला लावली आणि त्यांना न विचारताच त्या निघून गेल्या, असा आरोप भाजपने केला होता. 

हेही वाचा : ममतांचा वारसदार ठरला...अभिषेक बॅनर्जींचा 'राज्याभिषेक'

सध्या देशात कोरोना लसीकरणाचा चौथा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस दिली जात आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 1एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते. परंतु, आता लस नसल्याने अनेक लसीकरण केंद्रे बंद पडली आहेत. 

सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यातील पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आली. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील व्यक्तींनाही लस दिली गेली. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख