मे महिन्याच्या मध्यात देशात कोरोनाचा कहर सर्वाधिक वाढणार पण महाराष्ट्रात होणार कमी - covid second wave peak in india is between mid of may | Politics Marathi News - Sarkarnama

मे महिन्याच्या मध्यात देशात कोरोनाचा कहर सर्वाधिक वाढणार पण महाराष्ट्रात होणार कमी

वृत्तसंस्था
शनिवार, 24 एप्रिल 2021

देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत देशात 3 लाख 46 हजार नवीन रुग्ण सापडले आहेत. 

नवी दिल्ली : देशातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली आहे. जगातील कोणत्याही देशात आतापर्यंत एका दिवसांत नोंदवण्यात आले नाहीत तेवढे रुग्ण भारताने सलग तिसऱ्या दिवशी नोंदवले आहेत. मात्र, मे महिन्याच्या मध्यात कोरोनाचा कहर सर्वाधिक वाढण्याचा अंदाज आहे. यामुळे मे महिन्यात देशात कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट होण्याची शक्यता आहे. याचवेळी महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या घसरण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. 

आयआयटी कानपूर आणि हैदराबादमधील 'शास्त्रज्ञांनी ससेप्टीबल, अनडिटेक्टेड, टेस्टेड, रिमूव्ह्ड अॅप्रोच' (सूत्र) गणितीय पद्धतीने हा अंदाज व्यक्त केला आहे. यानुसार, देशातील कोरोनाच्या दुसरी लाट मे महिन्याच्या मध्यात सर्वाधिक वाढेल. दिल्ली, हरियाना, राजस्थान आणि तेलंगण या राज्यात 25 ते 30 एप्रिलदरम्यान जास्त रुग्ण आढळतील. याचवेळी महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यात आताच कोरोनाच्या रुग्णसंख्येने शिखर गाठले असून, ती ओसरू लागेल, अशी शक्यता आहे.  

देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 11 ते 15 या काळात 33 ते 35 लाखांवर जाईल. याचबरोबर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शिखर गाठल्यानंतर तेवढ्यात वेगाने ती खाली येईल. मे महिन्याच्या अखेरीस लाट कमी होऊ लागेल आणि रुग्णसंख्याही कमी होईल, अशी माहिती आयआयटी कानपूरमधील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागाचे प्राध्यापक महिंद्र अग्रवाल यांनी दिली. 
24 तासांत सापडले 3 लाख 46 हजार रुग्ण 

देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 1 कोटी 66 लाख 10 हजार 481 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 1 लाख 89 हजार 544 झाली आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत कोरोनाचे नवीन 3 लाख 46 हजार 786 रुग्ण सापडले, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे

देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 25 लाखांवर गेली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या वाढल्याने देशातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे रुग्णांसाठी रुग्णालये अपुरी पडू लागल्याचे चित्र आहे. देशातील कोरोनाची रुग्णसंख्या सलग 45 व्या दिवशी वाढली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 25 लाख 52 हजार 940 असून, एकूण बाधितांमध्ये याचे प्रमाण 15.37 टक्के आहे. देशात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी होऊन ते 83.49 टक्क्यांवर आले आहे. देशात बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 38 लाख 67 हजार 997 आहे. याचवेळी मृत्यूदर 1.14 टक्के आहे. 

देशातील कोरोना रुग्णसंख्या वाढीचे टप्पे 
20 लाख : 7 ऑगस्ट  (2020) 
30 लाख : 23 ऑगस्ट  
40 लाख : 5 सप्टेंबर  
50 लाख : 16 सप्टेंबर 
60 लाख : 28 सप्टेंबर 
70 लाख : 11 ऑक्टोबर  
80 लाख : 29 ऑक्टोबर  
90 लाख : 20 नोव्हेंबर 
1 कोटी : 19 डिसेंबर 
1.5 कोटी : 19 एप्रिल (2021)  

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख