धोक्याची घंटा : बालकांमध्ये वाढतोय कोरोना; राज्यात ९० हजार मुलांना संसर्ग - covid 19 infection cases in child are rising in maharashtra | Politics Marathi News - Sarkarnama

धोक्याची घंटा : बालकांमध्ये वाढतोय कोरोना; राज्यात ९० हजार मुलांना संसर्ग

वृत्तसंस्था
शनिवार, 3 एप्रिल 2021

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका लहान मुलांना बसताना दिसत आहे. 
 

मुंबई : राज्यात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका लहान मुलांना बसत आहे. राज्यात आतापर्यंत ८८ हजार ८२७ लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. काही दिवसांत हा आकडा ९० हजारांवर जाईल. लहान मुलांतील संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याने सरकारच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. 

राज्यात आलेल्या कोरोनाच्या पहिल्या लाटेत लहान मुलांचे बाधित होण्याचे प्रमाण कमी होते. आधी बहुतांश बाधित लहान मुले ही लक्षणे विरहित होती. शिवाय त्यांना काही त्रासही जाणवत नव्हता. गेल्या वर्षी डिसेंबरपर्यंत राज्यात ६ हजार ७०४ लहान मुले बाधित झाली होती. एकूण रुग्णांमध्ये बाधित होण्याचे प्रमाण हे ३.१४ होते. आता राज्यात कोरोनाची लाट आली आहे. यात दहा वर्षांच्या आतील लहान मुलांचे बाधित होण्याचे प्रमाण वाढले आहे. आता बाधित होण्याचे प्रमाण हे ३.६१ वर पोचले आहे. यात नवजात बालकांचाही समावेश आहे.

लॉकडाउनचे नियम शिथिल झाल्यानंतर नागरिकांमध्ये बिनधास्तपणा आणि बेफिकीरी आली आहे. पालक हे लहान मुलांना घराबाहेर घेऊन जात आहेत. उद्याने तसेच गृहसंस्थेच्या मोकळ्या आवारात मुलांची गर्दी जमताना दिसू लागली आहे. लहान मुले अनेक वेळा एकत्र खेळतात. यामुळे त्यांना संसर्ग होण्याचे प्रमाण आता वाढले आहे. शिवाय कोरोना विषाणूनेही स्वरूप बदलल्याचा फटका लहान मुलांना बसू लागला आहे.

किशोरवयीन मुलांमध्येही धोका वाढतोय 
लहान मुलांप्रमाणे ११ ते २० वयोगटातील मुलांमध्येही संसर्गाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. आजपर्यंत या वयोगटातील १ लाख ८७ हजार २८७ जण बाधित झाले आहेत. हे प्रमाण ६.६३ टक्के आहे.

याविषयी बोलताना राज्य कोरोना कृती दलाचे प्रमुख डॉ. संजय ओक म्हणाले की, लहान मुलांचे बाधित होण्याचे प्रमाण वाढत असून, ते चिंताजनक आहे. घरातील मोठ्यांमुळे किंवा एकत्र खेळण्यामुळे लहान मुलांना संसर्ग होत आहे. पालकांनी याकडे लक्ष देऊन आणखी जबाबदारीने वागण्याची गरज आहे. आता यावर लसीकरणाप्रमाणे वेगळ्या उपाययोजना करणे आवश्यक आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख