अटक योग्यच असल्याचा न्यायालयाचा निर्वाळा अन् राणेंना तंबीही!

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाड येथील न्यायालयानं जामीन दिला आहे.
अटक योग्यच असल्याचा न्यायालयाचा निर्वाळा अन् राणेंना तंबीही!
court says union minister narayan ranes arrest is justified

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना महाड येथील न्यायालयानं जामीन दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन पोलिसांनी राणेंना काल (ता.24) अटक केली होती. त्यानंतर महाड न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पाटील यांनी राणेंना रात्री जामीन मंजूर केला. या वेळी राणेंची अटक योग्यच असल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला. 

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एस. पाटील यांच्या न्यायालयात राणेंना काल हजर करण्यात आले. राणेंची 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली. त्यांनी 31 ऑगस्ट व 13 सप्टेंबरला पोलिसांसमोर हजेरी लावण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. या वेळी राणेंनी राजकीय हेतूने अटक केल्याचा आरोप केला. तसेच, कोणतीही पूर्वसूचना न देता अटक केल्याचा मुद्दा उपस्थित केला. राणेंना प्रकृतीचे कारण आणि केंद्रीय मंत्री असल्याचा मुद्दाही मांडला. 

राणेंना झालेली अटक ही योग्य आहे. मग त्याचे कारण कोणतेही का असेना. परंतु, त्यांना पोलीस कोठडी देण्याची आवश्यकता नाही, असे मत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.एस.पाटील यांनी व्यक्त केले. त्यांनी जामिनाच्या आदेशात म्हटले आहे की, अशा प्रकारचा गुन्हा राणेंनी पुन्हा करु नये. याचबरोबर त्यांनी पुराव्यासोबत छेडछाड करु नये. याचबरोबर या खटल्याशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे निगडीत व्यक्तीला भीती तसेच, आमिष दाखवू नये.  

राणे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिष्ठेबद्दल बोलले आहेत, वक्तव्यामागे त्यांचा काही कट होता का, याचा तपास करण्यासाठी सात दिवसांची कोठडी देण्याची विनंती सरकारी पक्षाकडून न्यायालयात करण्यात आली. राणे हे जबाबदार व्यक्ती आहेत मग ते बेजाबाबदारपणे का वागले?, असा मुद्दाही त्यांनी मांडला. तर राणे यांचं वक्तव्य राजकीय स्वरूपाचं आहे. त्यांच्यावर लावण्यात आलेली कलमे चुकीची असल्याने त्यांना जामीन द्यावा, असा युक्तीवाद राणे यांच्या वकिलांनी केला. 

अटक करण्यापूर्वी त्यांना कुठलीही नोटीस देण्यात आली नाही. त्यांच्या वक्तव्यामागे कोणतंही षडयंत्र नव्हतं. पत्रकार परिषदेत हे वक्तव्य करण्यात आलेलं आहे. खोटी कलमं लावण्यात आली आहेत. त्यांची अटक बेकायदेशीर आहे, असंही त्यांनी न्यायालयाला सांगितलं. तसेच राणेंच्या प्रकृतीची माहितीही वकिलांनी न्यायालयाला दिली. सुमारे पाऊन तास दोन्ही बाजूचा युक्तीवाद सुरू होता. त्यानंतर न्यायालयाने सरकार पक्षाने केली मागणी फेटाळून लावत जामीन मंजूर केला.

दरम्यान राणेंना अटक करण्यासाठी अनेक ठिकाणच्या पोलिसांनी कारवाई सुरू केल्यानंतर त्यांनी रत्नागिरीतील न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने राणेंना जामीन देण्यास नकार दिला. तांत्रिक मुद्द्यावर हा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. नाशिकमध्ये गुन्हा दाखल असताना रत्नागिरीत जामीन अर्ज का, या मुद्द्यावर हा अर्ज फेटाळण्यात आला. यानंतर राणेंच्या वतीने उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्जासाठी अर्ज करण्यात आला होता. परंतु, उच्च न्यायालयाने यावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. त्यानंतर काही वेळातच राणेंना अटक करण्यात आली.

न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळताच त्यांना ताब्यात घेण्यासाठी संगमेश्वरमधील गोळवली गावात पोलीस दाखल झाले होती. पोलिसांनी राणेंना ताब्यात घेतले. त्यांच्या अटकेची कारवाई पोलिसांनी सुरू केली. राणेंची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी डॉक्टरांचे पथकही दाखल झाले होते. वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर राणेंना अटक करुन पोलीस घेऊन गेले होते.

Related Stories

No stories found.