The country and its people have placed their trust in PM Modi says Devendra Fadnavis
The country and its people have placed their trust in PM Modi says Devendra Fadnavis

फडणवीस म्हणतात, बिहारमध्ये जिकडे जाईल तिकडे मोदींचेच नाव!

बिहारच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचाराला वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी सुरू झाल्या आहेत.

मुंबई : बिहारमधील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. भाजपने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचावर बिहारच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपवली आहे. याचबरोबर फडणवीस यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा समावेश स्टार प्रचारकांमध्ये करण्यात आला आहे. फडणवीस यांनी बिहारमध्ये प्रचारास जोरदार सुरूवात केली आहे.  

बिहारची मोठी जबाबदारी पक्षाने फडणवीस यांच्यावर सोपवली आहे. फडणवीस हे बिहारमध्ये आक्रमकपणे प्रचार करताना दिसत आहेत. बिहारमधील प्रचाराविषयी बोलताना फडणवीस म्हणाले की, बिहारमधील जनतेत खूप उत्साह दिसत आहे. आम्ही बिहारमध्ये जिकडे जाऊ तिकडे लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव घेताना दिसतात. देशाने आणि जनतेने पंतप्रधान मोदींवर विश्वास टाकला आहे. या विश्वासाचा फायदा केवळ आम्हालाच नव्हे तर घटक पक्षांनाही होईल. 

भाजपने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 30 स्टार प्रचारकांची नवी यादी जाहीर केली आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथसिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, नितीन गडकरी, बी.एल.संतोष, सौदनसिंह, डॉ. संजय जयस्वाल, सुशीलकुमार मोदी, भूपेंद्र यादव, देवेंद्र फडणवीस, राधामोहनसिंह, रविशंकर प्रसाद, गिरीराजसिंह, स्मृती इराणी, अश्वनीकुमार चौबे, नित्यानंद राय, धर्मेंद्र प्रधान, योगी आदित्यनाथ, रघुवर दास, मनोज तिवारी, नंदकिशोर यादव, राजीव प्रताप रूडी, शाहनवाज हुसेन, मंगल पांडे, शिव नारायण, गोपाल ठाकूर, अजय निशाद, संजय पासवान आणि सम्राट चौधरी यांचा समावेश आहे. 

भाजपने सुरूवातीला जाहीर केलेल्या यादीतून गेली अनेक वर्षे पक्षाचा चेहरा असलेले खासदार राजीव प्रताप रूडी व शाहनवाज हुसेन यांची नावे गायब होती. मूळचे बिहारमधील असलेले आणि राष्ट्रीय स्तरावर छाप पाडणाऱ्या नेत्यांनाच भाजपने डावलल्याने पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आले होते. याचबरोबर फडणवीस वगळता महाराष्ट्रातील एकाही नेत्याचे नाव यादीत नव्हते. याचबरोबर केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील नेते नितीन गडकरी आणि प्रकाश जावडेकर यांचाही समावेश नव्हता.

बिहारच्या कोणत्याही निवडणुकीत भाजप प्रचारकांच्या यादी इतर नेत्यांची नावे बदलत मात्र,  रुडी आणि शाहनवाज यांची नावे कायम असत. गेल्या तीन-साडेतीन दशकांत पहिल्यांदाच या दोघांची नावे स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळली गेली आहेत. रूडी यांनी याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केल्यानंतर हा मुद्दा चव्हाट्यावर आला. वाजपेयी-अडवानी काळापासून भाजपबरोबर असलेले रूडी व शाहनवाज सध्या भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत. पक्षाने अखेर नवीन यादी जाहीर करीत रूडी आणि शाहनवाज यांच्यासोबत गडकरी यांनाही स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान दिले आहे. 

बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत होत आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला होणार असून, यात ७१ मतदारसंघ आहेत. दुसरा टप्पा  ३ नोव्हेंबरला असून, यात ९४ मतदारसंघ आहेत. तिसरा टप्पा ७ नोव्हेंबर असून, यात ७८ मतदारसंघ आहेत. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आता स्पष्ट झाले आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com