घाबरू नका...कोरोना होणार सर्दी-खोकल्यासारखा दशकभरात सामान्य - coronavirus will be like normal cold and fever virus in ten years | Politics Marathi News - Sarkarnama

घाबरू नका...कोरोना होणार सर्दी-खोकल्यासारखा दशकभरात सामान्य

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 मे 2021

जगभरात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली असून, संपूर्ण जग या लाटेत होरपळत आहे. 

नवी दिल्ली : जगभरात कोरोना (Covid19) संसर्गाची दुसरी लाट आली असून, संपूर्ण जग या लाटेत होरपळत आहे. मागील वर्षाहून अधिक काळ कोरोनाशी जग झुंजत आहे. कोरोनाचा विषाणू सर्दी (Cold) आणि खोकल्याच्या  (Fever) सामान्य विषाणूसारखा (virus) होणार असल्याचा दावा एका नव्या संशोधनात करण्यात आला आहे. परंतु, यासाठी दशकभराची प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

संशोधकांनी कोरोनाच्या सध्याच्या साथीवर आणि मानवी शरीराच्या बदलत्या प्रतिकारशक्तीवर आधारित गणितीय प्रारूपाच्या आधारे संशोधनाअंती हा निष्कर्ष काढला आहे. ‘व्हायरसेस’ या नियतकालिकात हे संशोधन प्रकाशित झाले आहे. हे प्रारूप भविष्यातील कोरोनाच्या वाटचालीचा अचूक अंदाज वर्तवू शकत नसल्याती मर्यादाही संशोधकांनी  आधीच स्पष्ट केली आहे. 

याविषयी अमेरिकेतील उटाह विद्यापीठातील जीवशास्त्राचे प्रा.फ्रेड ॲडलर म्हणाले,की समूह प्रतिकारशक्ती वाढल्यानंतर येत्या दशकभरात कोरोना संसर्गाची तीव्रता कमी होऊ शकते. विषाणुतील बदलांपेक्षा मानवी प्रतिकारशक्तीतील बदलाचा कोरोनाच्या साथीवर परिणाम होऊ शकतो. कोरोना साथीच्या सुरुवातीला मानवी प्रतिकारशक्ती या विषाणुशी लढण्यास तयार नव्हती. मात्र,  प्रौढ व्यक्तींची प्रतिकारशक्ती संसर्ग किंवा लसीकरणातून वाढत जाईल तसतशी कोरोना संसर्गाची तीव्रता कमी होत जाईल. विषाणूच्या संपर्कात प्रथमच मुले आली तरी नैसर्गिकरित्या त्यांना गंभीर आजार होण्याचा धोका कमी असतो. 

हेही वाचा : ऐकावं ते नवलच...आता कोरोनादेवी करणार महामारीतून मुक्तता 

कोरोना विषाणुविरुद्ध मानवी प्रतिकारशक्तीच्या आधारे हे गणितीय प्रारुप तयार करण्यात आले आहे. कोरोना साथीचे विश्लेषण करून अधिक लोकसंख्येला दीर्घकाळासाठी सौम्य संसर्गाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. लसीकरण अथवा संसर्गानंतर प्रतिकारशक्ती वाढून कोरोना सौम्य होण्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. 

सध्याच्या कोरोना विषाणूव्यतिरिक्त इतर विषाणुंचाही मानवाला संसर्ग होत असतो. मात्र, ते मानवासाठी कमी धोकादायक आहेत. त्यातील एखादाच विषाणू हा सध्याच्या कोरोना विषाणुसारखा तीव्र होतो. १९ व्या शतकात अशीच रशियन फ्लूची साथ आली होती. नंतर ती सौम्य झाली, असे संशोधकांने स्पष्ट केले.  

देशात 24 तासांत 4 हजार 209 जणांचा मृत्यू 
देशात मागील 24 तासांत 2 लाख 59 हजार नवीन रुग्ण सापडले असून, 4 हजार 209 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे याच काळात बरे होऊन रुग्णालयातून बाहेर पडलेल्या रुग्णांची संख्या साडेतीन लाख आहे.  देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 2 कोटी 60 लाख 31 हजार 991 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 2 लाख 91 हजार 331 झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

Edited by Sanjay Jadhav
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख