पंजाबबाबत लवकरच मोठा निर्णय...सिद्धू आणि प्रियांका गांधींची गोपनीय भेट? - congress punjab leader navjot singh sidhu may have meet priyanka gandhi | Politics Marathi News - Sarkarnama

पंजाबबाबत लवकरच मोठा निर्णय...सिद्धू आणि प्रियांका गांधींची गोपनीय भेट?

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 जुलै 2021

पंजाब काँगेसमधील संघर्षात आता हाय कमांडने लक्ष घातले आहे. काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी प्रियांका गांधींची गूपचूप भेट घेतल्याचे समजते. 

नवी दिल्ली : पंजाब (Punjab)  काँगेसमधील (Congress) संघर्षात आता हाय कमांडने लक्ष घातले आहे. काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू (Navjyot Singh  Sidhu) यांनी काही दिवसांपूर्वी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची भेट घेतली होती. त्यानंतर पुन्हा एकदा सिद्धू यांनी रविवारी (ता.11) प्रियांका गांधींची भेट घेतल्याचे समजते. याला काँग्रेसकडून दुजोरा देण्यात आला नसला तरी पंजाबबाबत 3 ते 4 दिवसांत मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. 

पंजाबमधील अंतर्गत वाद पक्षाला विधानसभा निवडणुकीच्या आधी परवडणारा नाही. सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपद मागितले आहे. पक्षाने मात्र, त्यांना प्रचारप्रमुखाची जबाबदारी देण्याची तयारी दर्शविली आहे. सिद्धू हे प्रदेशाध्यक्षपदावर ठाम असून, त्यांनी 11 जुलैला प्रियांका गांधी यांची भेट घेतल्याचे समजते. याला पक्षाकडून दुजोरा देण्यात आलेले नाही. परंतु, प्रदेशाध्यक्षपद सिद्धू देण्याआधी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांना आधी विश्वासात घेतले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

याआधी सिद्धू हे 30 जूनला प्रियांका यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. त्यानंतर त्या पहिल्यांदा राहुल यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भेटल्या होत्या. नंतर त्या पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी गेल्या होत्या. या सर्व घडामोडी सुरू होत्या त्यावेळी सिद्धू हे प्रियांका यांच्याच निवासस्थानी होते. सिद्धू यांना भेट न दिल्यास अंतर्गत कलह आणखी वाढण्याची शक्यता असल्यामुळे प्रियांका यांनी या प्रकरणी पुढाकार घेतला होता. यानंतर राहुल आणि सिद्धू यांची भेट झाली होती. 

दरम्यान, मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधींची नुकतीच भेट घेतली होती. मुख्यमंत्री अमरिंदरसिंग चॉपरने दिल्लीत दाखल झाले होते. पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. यामुळे त्याआधी पक्षांतर्गत वाद मिटवण्यासाठी ही भेट होती. सिद्धू यांना राज्यात मोठे पद दिले जाईल, अशी शक्यता वर्तविण्यात आहे. पक्षांतर्गत वादाचा फटका आगामी निवडणुकांत बसू नये म्हणून आता पक्ष नेतृत्वाने पावले उचलण्यास सुरवात केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

हेही वाचा : पायलट यांच्या बंडाला एक वर्ष पूर्ण...काय कमावलं, काय गमावलं? 

अमरिंदरसिंग यांना भेट नाकारणाऱ्या नेतृत्वाने सिद्धू यांना भेट दिल्याने मोठी चर्चा सुरू झाली होती. सिद्धू यांचे पारडे आता जड झाल्याचे बोलले जात होते. असे असले तरी राज्यात काँग्रेसचे नेतृत्व अमरिंदर करतील हे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे. पंजाबमध्ये काँग्रेसमधील संघर्ष वाढू लागल्याने दिवसेंदिवस नेतृत्वाची डोकेदुखी वाढू लागली होती. या पार्श्वभूमीवर अमरिंदरसिंग यांनी सोनिया गांधींची घेतलेली भेट महत्वूपर्ण मानली जात होती. 

पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. पण त्याआधीच काँग्रेसमधील अनेकांनी मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. नवज्योतसिंग सिद्धू आणि मुख्यमंत्र्यांमध्ये सातत्याने जोरदार खडाजंगी होत आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने काँग्रेसमध्ये उघडपणे दोन गट पडल्याचे दिसते. सिद्धू यांची लोकप्रियता जास्त असल्याने पक्ष नेतृत्वालाही त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे अवघड बनले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख