पायलट यांच्या महिनाभराच्या बंडाला काँग्रेसची समितीचीच मात्रा अचूक लागू ! - congress party formed committe to resolve issues about sachin pilot | Politics Marathi News - Sarkarnama

पायलट यांच्या महिनाभराच्या बंडाला काँग्रेसची समितीचीच मात्रा अचूक लागू !

वृत्तसंस्था
सोमवार, 10 ऑगस्ट 2020

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात सचिन पायलट यांनी बंडाचे निशाण फडकावले होते. आता त्यांचे बंड शमल्याची चिन्हे असून, विधानसभेचे अधिवेशन 14 ऑगस्टला होत असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. 

जयपूर : राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात सचिन पायलट यांनी बंड पुकारले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी विधानसभा अधिवेशन बोलावले आहे. यामुळे राज्यातील राजकीय हालचाली पुन्हा वेगवान झाल्या आहेत. आता पायलट यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची भेट घेतली आहे. यामुळे पालयट यांचे बंड अखेर शमल्याची चिन्ह आहेत. पायलट यांच्या तक्रारी सोडविण्यासाठी काँग्रेसने अखेर समितीची मात्रा लागू केली आहे.  

विधानसभा अधिवेशन १४ ऑगस्टपासून बोलावण्यास राज्यपालांनी मान्यता दिली आहे. याचबरोबर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अधिवेशनादरम्यान सर्व उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. आता विधानसभा अधिवेशन होणार असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. गेहलोत सरकारसाठी हे अधिवेशन कसोटीचे तर पायलट यांच्यासाठी अस्तित्वाचे ठरणार आहे. यामुळे गेहलोत हे फार खबरदारी घेत आहेत. त्यांनी आधी काँग्रेस आमदारांना जयपूरमधील हॉटेल फेअरमाँटमध्ये ठेवले होते.  आता या आमदारांना जैसलमेरमधील सूर्यगड हॉटेलमध्ये हलविण्यात आले आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पायलट यांनी ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांची काल भेट घेतली होती. यानंतर आज त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भेटीची वेळ मागितली होती. त्यांना तातडीने भेटीची वेळ देण्यात आली. राहुल गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीत राहुल यांच्यासोबत प्रियांका गांधी याही होत्या. या दोन्ही नेत्यांनी पायलट यांच्याशी चर्चा केली. याचबरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल आणि के.सी.वेणुगोपाल यांच्या संपर्कात पायलट कायम होते. पायलट यांनी आता मवाळ भूमिका घेतली आहे. ते पक्षात परत येण्याच्या प्रयत्नात आहेत. याचवेळी त्यांच्यासोबत गेलेले बंडखोर आमदारही परत येण्यासाठी पक्ष नेतृत्वाच्या संपर्कात आहेत.

काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी पायलट यांची बाजू आता ऐकून घेतली आहे. ते आणखी काही ज्येष्ठ नेत्यांची भेट लवकरच घेणार आहेत. पायलट यांनी काही तक्रारी पक्ष नेतृत्वासमोर मांडल्या आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी काँग्रेसने अनेकवेळा वापरलेली समितीची मात्रा पुन्हा वापरली आहे. गेहलोत आणि पायलट यांच्यातील मतभेदांवर ही समिती तोडगा काढणार आहे. पायलट यांनी महिनाभरापासून अधिक काळ केलेल्या बंडाला अखेर काँग्रेसने नेहमीची समितीची मात्रा अचूक लागू केली आहे, असे सूत्रांनी सांगितले. 

राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडमधील आधी मध्य प्रदेशातील ज्योतिरादित्य शिंदे पक्षातून बाहेर पडले होते. त्यानंतर राजस्थानमध्ये पायलट यांनी बंडाचे निशाण फडकावले. यामुळे काँग्रेसमध्ये ज्येष्ठ विरुद्ध तरुण हा वाद उफाळून आला आहे. पक्षात तरुण नेत्यांवर अन्याय होत असल्याची भावना आहे. यामुळे गेहलोत आणि पायलट यांच्यातील मनोमिलन निश्चिच मानले जात आहे. 

पायलट हे राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री होते. त्यांनी मुख्यमंत्री गेहलोत यांच्याविरोधात बंड केल्याने काँग्रेसने त्यांची प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्रिपदावरुन 14 जुलैला उचलबांगडी केली होती. याचबरोबर विधानसभा अध्यक्षांनी पायलट आणि इतर १८ आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली आहे. या नोटिशीला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. उच्च न्यायालयाने या प्रकरणी स्थगिती दिली आहे. याला विधानसभा अध्यक्ष सी.पी.जोशी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आता याला काँग्रेसचे मुख्य प्रतोद महेश जोशी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख