विधानसभा अध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाण की संग्राम थोपटे? - congress party is discussing about assembly speaker post candidates | Politics Marathi News - Sarkarnama

विधानसभा अध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाण की संग्राम थोपटे?

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 20 जानेवारी 2021

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. यामुळे विधानसभा अध्यक्षपदासाठीच्या नावांवर काँग्रेसमध्ये खल सुरू झाला आहे.  

मुंबई : काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी विद्यमान विधानसभा अध्यक्ष आणि विदर्भातील नेते नाना पटोले यांचे नाव जवळपास निश्‍चित झाले आहे. पटोले यांच्या जागी विधानसभा अध्यक्षपदासाठीच्या नावांवर काँग्रेसमध्ये खल सुरू झाला आहे. पक्षातून अनेक नावे चर्चेत असून, लवकरच विधानसभा अध्यक्षपदी नवीन चेहरा मिळणार असल्याचे निश्‍चित झाल्याचे समजते.

काँग्रेसमधील काही नेत्यांनी प्रदेशाध्यक्षपदी नवीन चेहरा नेमण्याची मागणी पक्ष नेतृत्वाकडे केली होती. सध्या प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री आणि विधिमंडळ गटनेते अशी तीन पदे बाळासाहेब थोरात यांच्याकडे आहेत. पक्षांतर्गत नाराजीमुळे त्यामुळे थोरात यांनीच प्रदेशाध्यक्षपदावरून पायउतार होण्याची तयारी केली आहे. याबाबत त्यांनी दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींना विनंतीही केली होती. त्यानंतर प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीबाबत घडामोडींना वेग आला होता. 

काँग्रेसने प्रभारी एच. के. पाटील यांनी मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आणि काँग्रेस प्रदेश महिला अध्यक्ष पदांवर नियुक्‍त्या केल्या. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष नेमण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्यासाठी नाना पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मराठवाड्यातील काँग्रेसचे नेते आमदार सुरेश वरपुडकर, आमदार संग्राम थोपटे, आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांच्या नावांची चर्चा आहे.

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर विधानसभा अध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा होती. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून विरोध झाला होता. त्यांच्यानंतर सुरेश वरपूडकर ज्येष्ठ नेते असून, त्यांच्या नावाची चर्चा आहे. सध्याचे आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांच्या नावाचीही चर्चा आहे. पुणे जिल्ह्यातील कॉंग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांच्या नावाचाही विचार सुरू आहे. थोपटे यांचे मंत्रिपद हुकल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे. थोपटे यांची दखल पक्ष घेईल, असेही सांगितले जात आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख