पायलट यांना काँग्रेसची फायनल ऑफर; राज्यासह राष्ट्रीय पातळीवर स्थान - congress offers three cabinet to pilot supporters says sources | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

पायलट यांना काँग्रेसची फायनल ऑफर; राज्यासह राष्ट्रीय पातळीवर स्थान

वृत्तसंस्था
बुधवार, 16 जून 2021

पक्षाने दिलेली आश्वासने पूर्ण न केल्यामुळे नाराज असलेले नेते सचिन पायलट यांना अखेर काँग्रेसने फायनल ऑफर दिली आहे. 

नवी दिल्ली : राजस्थानमधील (Rajasthan) काँग्रेस (Congress) नेते सचिन पायलट (Sachin Pilot) हे पक्षाने दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याने  दिल्लीत दाखल झाले होते. ते दिल्लीतून आज राजस्थानला परतले आहेत. राज्यात पायलट समर्थकांना तीन कॅबिनेट मंत्रिपदे आणि पायलट यांना पक्षाचे सरचिटणीस व राज्य प्रभारी बनवण्याची ऑफर पक्षाने दिली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाने पायलट यांना फायनल ऑफर दिली आहे. यात पायलट समर्थकांना राज्यात तीन कॅबिनेट मंत्रिपदे देण्यात येतील. पायलट यांना पक्षाचे सरचिटणीस केले जाईल आणि एखाद्या महत्वाच्या राज्याचे त्यांना प्रभारी बनवण्यात येईल, असा प्रस्ताव पक्षाने ठेवला आहे. याचबरोबर महामंडळांमध्येही पायलट यांच्या समर्थकांना स्थान देण्यात येईल, असेही पक्षाने म्हटले आहे. 

पायलट यांनी पक्षाच्या ऑफरवर अद्याप निर्णय घेतलेला नाही. पायलट यांनी मंत्रिमंडळात समर्थक आमदारांना जास्त प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी लावून धरली होती. परंतु, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा याला विरोध आहे. मागील वर्षीच्या तुलनेत पायलट यांची ताकद कमी झाली आहे. त्यांना पाठिंबा देणारे आमदारही कमी होऊ लागले आहेत, यामुळे पक्षही त्यांच्या दबावाला फारसा बळी पडत नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

हेही वाचा : वादाच्या भोवऱ्यात सापडलेले चंपत राय आहेत कोण? 

राजस्थानमधील सरकारमध्ये सध्या 9 मंत्रिपदे रिक्त आहेत. पायलट यांनी ही सर्व मंत्रिपदे समर्थकांसाठी मागितली आहेत. मात्र, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी याला नकार दिला आहे. पायलट यांनी बंड केले त्यावेळी साथ देणाऱ्या अपक्ष व इतर आमदारांना डावलता येणार नाही, असे गेहलोत यांनी पक्ष नेतृत्वाला सांगितले आहे. हा आता वादाचा मुद्दा बनला आहे. मागील वर्षीही पक्षाच्या विरोधात बंड करुन पायलट दिल्लीत दाखल झाले होते. यामुळे राजस्थानमधील काँग्रेस सरकार संकटात आले होते. आता त्यांची मागणी मान्य केल्यास याची पुनरावृत्ती होऊ शकते, अशी भीती पक्षाला वाटत आहे. 

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. मागील वर्षी पायलट यांच्यासह त्यांच्या 18 समर्थक आमदारांनी बंड केल्यानंतर पक्षश्रेष्ठींकडून त्यांना काही आश्वासनं देण्यात आली होती. पण ही आश्वासनं अद्याप पूर्ण न झाल्यानं पायलट यांची नाराजी वाढल्याचे बोलले जात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडमधील जितिन प्रसाद यांच्या भाजप प्रवेशानंतर पायलट यांच्या भाजप प्रवेशाबाबत तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. 

सचिन पायलट हे 11 जूनला सायंकाळी दिल्लीत दाखल झाले होते. पक्षाच्या नेतृत्वाची ते भेट घेणार होते. पायलट यांनी मागील वर्षी केलेल्या बंडावेळी पक्षाने दिलेली अनेक आश्वासने पूर्ण केलेली नाहीत. यातच जितिन प्रसाद यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याने पायलट यांनी पक्षाला पुन्हा एकदा इशारा दिला होता. पक्ष कायम आपल्याला गृहित धरु शकत नाही, असा गर्भित इशाराही पायलट यांनी दिला होता. पायलट हे आज दिल्लीतून राजस्थानला परतले आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख