काँग्रेस खासदार म्हणतात, जिवाला काही बरेवाईट झाल्यास कॅप्टन अमरिंदरसिंग जबाबदार - congress mp pratap singh bajwa targets amarinder singh on issue of security | Politics Marathi News - Sarkarnama

काँग्रेस खासदार म्हणतात, जिवाला काही बरेवाईट झाल्यास कॅप्टन अमरिंदरसिंग जबाबदार

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 ऑगस्ट 2020

राजस्थानमधील काँग्रेसचे बंड शमत असतानाच पंजाबमध्ये काँग्रेस पक्षात अंतर्गत मतभेद उफाळून आले आहेत. या वादाच्या केंद्रस्थानी पक्षाचे दोन खासदार आहेत. 

नवी दिल्ली : राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात सचिन पायलट यांनी पुकारलेले बंड शमत असताना आता पंजाब काँग्रेसमध्ये मोठा वाद सुरू झाला आहे. पंजाबमध्ये काँग्रेस सत्तेत असून, स्वत:च्याच सरकारविरोधात पक्षाच्या दोन खासदारांनी भूमिका घेतली होती. यातील एक खासदार प्रतापसिंग बाजवा यां;r सुरक्षा राज्य सरकारने काढून घेतली आहे. यामुळे त्यांनी थेट मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्यावरच खळबळजनक आरोप केले आहेत.  

पंजाब काँग्रेसमधील वादाच्या केंद्रस्थानी राज्यसभा खासदार प्रतापसिंग बाजवा आणि शमशेरसिंग डुल्लो हे आहेत. पंजाबमध्ये विषारी दारूकांड झाले होते. या दारूकांडात तब्बल शंभरहून अधिक जणांचा बळी गेला आहे. या प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि सक्त वसुली संचालनालयामार्फत (ईडी) करावी, अशी मागणी राज्यपाल व्ही.पी. सिंह बडनोर यांच्याकडे या दोघांनी केली होती. 

आपल्याच पक्षाच्या विरोधात खासदारांनी भूमिका घेतल्याने पंजाबमध्ये राजकीय भूकंप झाला आहे. बाजवा आणि डुल्लो यांच्या विरोधात पंजाब काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांनी या प्रकरणी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून दोन्ही खासदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दोन्ही खासदार भाजपच्या संपर्कात असल्याचा आरोपही जाखड यांनी केला आहे.

खासदार बाजवा यांची सुरक्षा राज्य सरकारने काढून टाकली आहे. यावर त्यांनी पंजाबच्या पोलीस महासंचालकांनी पत्र लिहिले होते. माझ्या जिवाला काही बरेवाईट झाल्यास मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग आणि पंजाबचे पोलीस महासंचालक जबाबदार असतील, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. 

माझी सुरक्षा अचानक काढून टाकण्यात आली. पंजाब पोलिसांनी असे करण्यामागील कोणतेही कारण मला दिलेले नाही. पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार काल रात्री माझी सुरक्षा काढण्यात आली आहे. माझी सुरक्षा राजकीय कारणातून काढून घेण्यात आली आहे, असे बाजवा यांनी म्हटले आहे. 

पंजाबध्ये आता राजस्थानची पुनरावृत्ती होत असल्याचे चित्र आहे. पायलट हे राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री होते. त्यांनी मुख्यमंत्री गेहलोत यांच्याविरोधात बंड केल्याने काँग्रेसने त्यांची प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्रिपदावरुन 14 जुलैला उचलबांगडी केली होती. आता पायलट यांचे बंड अखेर शमले असले तरी पंजाबमध्ये नवे बंड पक्षाची डोकेदुखी वाढवत आहे. 

Edited by Sanjay Jadhav
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख