मुंबई : मराठवाड्यातील काँग्रेसचे निष्ठावंत आमदार राजेश राठोड यांना मागील वर्षी पक्षाने विधान परिषदेवर संधी दिली होती. आता त्यांची महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगावर नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी त्यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेवर सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी राठोड यांच्या या दोन्ही नियुक्त्यांना मंजुरी दिली आहे.
राठोड यांनी पक्षाने मागील विधानसभा निवणुकीत तिकिट दिले नव्हते. परंतु, त्यावेळी त्यांना दिलेला शब्द सहाच महिन्यांत पक्षाने पाळला होता. त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली होती. आता महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ च्या कलम ७६ (२) (त्र) अन्वये महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगावर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेवर सदस्यपदी राठोड यांची निवड करण्यात आली आहे. या दोन्ही पदांच्या सदस्यत्वाची मुदत 13 मे 2026 पर्यंत असणार आहे.
राठोड यांनी आमदारकीची शपथ घेतल्यानंतर भटके, विमुक्त, बंजारा आणि लबाना समाजाच्या प्रश्नाला हात घातला होता. त्यांनी अनुसूचित जातीचे आरक्षण आणि राज्यातील भटके विमुक्त जाती जमाती तसेच, ओबीसी समाजावर लादण्यात आलेली क्रिमीलेयरची अट रद्द करावी, अशी मागणीही त्यांनी लावून धरली होती.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य असलेले राजेश राठोड हे जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील आहेत. राठोड कुटुंब हे पूर्वीपासून काँग्रेसशी एकनिष्ठ आहे. मागील विधानसभा निवडणुकीत ते जालना मतदारसंघातून इच्छुक होते. त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती पण पक्षाने ऐनवेळी पक्षाने कैलास गोरंट्याल यांना उमेदवारी दिली होती. परंतु, नंतर त्यांना पक्षाने विधान परिषदेवर संधी देऊन त्यांच्या निष्ठेचे फळ दिले होते.
राजेश राठोड यांचे वडील धोंडीराम राठोड हे काँग्रेसकडून राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य होते. राजेश राठोड यांच्या मातोश्रीही जिल्हा परिषद सदस्य म्हणून राजकारणात सक्रिय होत्या. स्व:त राठोड हे आधी जिल्हा परिषदेत समाज कल्याण सभापती होते. युवक काँग्रेसचे सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम केले आहे. मंठा तालुक्यात राठोड यांच्या शैक्षणिक संस्थांही आहेत. ते बंजारा समाजाचे असून, समाजाच्या मागण्यासाठी ते आक्रमक भूमिका घेत असतात.
Edited by Sanjay Jadhav

