..तर कोथरुडकर मतदारांचं सोवळं मोडेल; नितीन राऊत यांचा चंद्रकांत पाटलांना टोला - Congress Minister Hits out at Bjp State President Chandrakant Patil | Politics Marathi News - Sarkarnama

..तर कोथरुडकर मतदारांचं सोवळं मोडेल; नितीन राऊत यांचा चंद्रकांत पाटलांना टोला

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 21 ऑगस्ट 2020

महाराष्ट्रातील जनता वाढत्या वीजबिलांनी त्रस्त असताना उर्जामंत्री उत्तर प्रदेशच्या राजकीय दौऱ्यावर गेले आहेत. उत्तर प्रदेशची जबाबदारी प्रियंका गांधी यांच्यावर सोपविण्यात आल्याने आपली कार्यतत्परता दाखवण्यासाठी त्यांच्यासमोर जाणे ही उर्जामंत्र्यांची राजकीय गरज असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच केली होती. त्याला राऊत यांनी उत्तर दिले आहे

मुंबई : भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या मनातील दलितांसाठीचे प्रेम अधिक प्रदर्शित करू नये, त्याने कोथरुडकर मतदारांचं सोवळं मोडेल आणि पुढच्यावेळी पुन्हा सुरक्षित मतदारसंघ शोधण्याची धावपळ करावी लागेल, असा टोला राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी लगावला आहे.

महाराष्ट्रातील जनता वाढत्या वीजबिलांनी त्रस्त असताना उर्जामंत्री उत्तर प्रदेशच्या राजकीय दौऱ्यावर गेले आहेत. उत्तर प्रदेशची जबाबदारी प्रियंका गांधी यांच्यावर सोपविण्यात आल्याने आपली कार्यतत्परता दाखवण्यासाठी त्यांच्यासमोर जाणे ही उर्जामंत्र्यांची राजकीय गरज असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच केली होती. त्याला राऊत यांनी वरीलप्रमाणे उत्तर दिले आहे.

गेल्या सहा वर्षांत देशात अनेक ठिकाणी अल्पसंख्य आणि दलित यांच्यावर अत्याचार झाले. काश्मीर तसेच उन्नाव मधील बलात्कार प्रकरणात तुमच्याच पक्षाचे नेते कार्यकर्ते गुंतले आहेत हा एक अनन्यसाधारण योगायोग आहे. झुंडहत्येतील जामिनावर सुटलेल्या आरोपींचे हारतुरे देऊन केंद्रीय मंत्री स्वागत करीत असल्याने, अशा प्रकरणांची पुनरावृत्ती सर्वत्र होणारच, असेही राऊत यांनी सुनावले आहे.

विजेची बिले वाढीव, अवास्तव नसून ती रास्त आहेत हे मी आणि अधिकाऱ्यांनी वेळोवेळी समजावून सांगितले आहे, याचा पुनरुच्चार करून यासंदर्भात योजलेल्या उपाययोजनांचाही उल्लेख राऊत यांनी आपल्या ट्वीटवरील पत्रकात केला आहे. पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने भाष्य करताना थोडा अभ्यास करावा, अशी अपेक्षा आहे. देशाची अर्थव्यवस्था आज व्हेंटीलेटरवर आहे. रिझर्व्ह बँकेकडून आगाऊ पैसे घेऊन पंतप्रधान देशाचा गाडा हाकत आहेत. प्रत्येक राज्याच्या खजिन्यात खडखडाट आहे, मलाही माझ्या खात्यात काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांचे पगार द्यायचे आहेत ही बाब आपण दुर्लक्षित करू नये, असेही त्यांनी दाखवून दिले आहे.

आमच्या काँग्रेस पक्षात श्रेष्ठींची मर्जी संपादन करण्यासाठी त्यांचे भक्त व्हावे लागत नाही, केवळ गुणवत्ता पाहिली जाते. माझ्याकडेही प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव आहे, मी प्रशिक्षणार्थी मंत्री नाही. तुमच्या मौलिक सूचनांबद्दल आभार, परतफेड म्हणून एकच सूचना आहे की दलितांसाठी आपल्या मनात प्रेम आहे ते अधिक प्रदर्शित करू नका. कोथरुडकर मतदारांचं सोवळं मोडेल आणि पुढच्या वेळी पुन्हा सुरक्षित मतदारसंघ शोधायची धावपळ करावी लागेल, असा टोलाही राऊत यांनी लगावला आहे. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख