ठाकरे मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल; काँग्रेसच्या दोन मंत्र्यांना मिळणार डच्चू - congress may replace its two ministers from maharashtra cabinet | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

ठाकरे मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल; काँग्रेसच्या दोन मंत्र्यांना मिळणार डच्चू

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 14 जुलै 2021

महाविकास आघाडी सरकारमध्ये लवकरच मोठ्या घडामोडी घडणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून मंत्रिमंडळात फेरबदल करण्यात येणार आहेत. 

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये लवकरच मोठ्या घडामोडी घडणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून मंत्रिमंडळात फेरबदल (Cabinet Reshuffle) करण्यात येतील. यात काँग्रेसच्या (Congress) विद्यमान दोन मंत्र्यांना डच्चू देण्यात येईल. काँग्रेसनेच मुख्यमंत्री ठाकरेंकडे ही मागणी केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अखिल भारतीय काँग्रेस समितीने राज्यातील काँग्रेसच्या मंत्र्यांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यात काँग्रेसच्या दोन कॅबिनेट मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात येईल. या जागी दोन नवीन मंत्र्यांचा समावेश मंत्रिमंडळात होईल. अखिल भारतीय काँग्रेस समितीने नुकतेच सर्व मंत्र्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन केले आहे. या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. 

कोरोना संकटाच्या काळात काँग्रेसच्या मंत्र्यांनी केलेल्या कामगिरीचे पक्षाने मूल्यमापन केले. यात दोन मंत्री कोरोना काळात घरातून फारसे बाहेर न पडल्याचे समोर आले. ते कोरोना संकटात सार्वजनिक ठिकाणी दिसले नव्हते. काँग्रेसने कोणत्या दोन मंत्र्यांना वगळायचे आणि कोणत्या नवीन दोन जणांचा मंत्रिमंडळात समावेश करायचे हेसुद्धा निश्चित केले आहे. आता हा मंत्रिमंडळातील फेरबदलाचा मुहूर्त मुख्यमंत्री ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वेळेच्या उपलब्धतेवर अवलंबून आहे. 

हेही वाचा : काँग्रेसचे नेतृत्व राहुल गांधी करणार का? आज होणार फैसला 

विधानसभा अध्यक्षपदावरून महाविकास आघाडीत कसलाही वाद नाही. ठरल्याप्रमाणे काँग्रेस पक्षाकडेच अध्यक्षपद आहे आणि ते काँग्रेसकडेच राहील. आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांनीही तसे स्पष्ट केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात कोरोनामुळे अध्यक्षपदाची निवडणूक होऊ शकली नाही, परंतु लवकरच ही निवडणूक पार पडेल, असेही काँग्रेस सूत्रांनी स्पष्ट केले. 

राज्यातील २४ जिल्हा परिषदा, १४४ नगरपालिका आणि २२ महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीच्या तयारीसाठी व त्यासंदर्भात रणनिती ठरवण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. निवडणुका सहा महिन्यांसाठी पुढे ढकलल्यामुळे तयारीसाठी वेळ मिळाला आहे. काँग्रेस पक्ष या निवडणुकीसाठी तयारी करत आहे. काही जिल्हा कमिट्यांची पुनर्रचना करण्याची गरज आहे. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे मागास वर्गाच्या हिताचे रक्षण करणे गरजेचे असल्याची काँग्रेसची भूमिका आहे, असेही सूत्रांनी नमूद केले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख