राजस्थानमध्ये पंजाब फॉर्म्युला...सिद्धू यांच्याप्रमाणेच पायलट यांना प्रदेशाध्यक्षपद?

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलटयांच्यातील वाद सुरूच आहे.
congress may apply punjab formula in rajasthan
congress may apply punjab formula in rajasthan

नवी दिल्ली : राजस्थानचे (Rajasthan) मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्यातील वाद सुरूच आहे. यातच काँग्रेसचे (Congress) राजस्थान प्रभारी अजय माकन (Ajay Maken) यांनी केलेल्या रिट्विटमुळे वेगळेच संकेत मिळत आहेत. पंजाबची (Punjab) पुनरावृत्ती राजस्थानमध्ये होण्याची शक्यता असून, सिद्धू यांच्याप्रमाणेच पायलट यांना प्रदेशाध्यक्षपद मिळू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

मागील काही दिवसांपासून गेहलोत आणि पाललट गटामध्ये संघर्ष वाढला होता. काही दिवसांपूर्वी सचिन पायलट हे दिल्लीतही गेले होते. त्यांनी केलेल्या मागण्यांवर वर्षभरानंतरही पक्षाने निर्णय न घेतल्याने ते नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर माकन हे नुकतेच राज्यात  दाखल झाले होते. त्यांची गेहलोत यांच्यासह पायलट गटाचीही बैठक घेतली होती. पायलट समर्थकांना पक्ष संघटनेत आणि सरकारमध्ये स्थान देण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली होती. 

माकन यांनी केलेल्या रिट्विटमुळे पंजाबचा फॉर्म्युला राजस्थानमध्ये वापरला जाण्याचे संकेत मिळू लागले आहेत. या ट्विटमध्ये म्हटले आहे की, कोणत्याही राज्यात स्थानिक नेते आपल्या बळावर जिंकत नाहीl. गांधी-नेहरू परिवाराच्या नावावर गरीब, वंचित आणि सामान्य नागरिकांची मते मिळतात. ते मग अमरिंदरसिंग असोत, गेहलोत असोत अथवा शीला दिक्षित असोत. हे सर्व जण मुख्यमंत्री बनले की समजतात आमच्यामुळेच पक्ष जिंकला. 

माकन यांच्या रिट्विटमुळे राजस्थानमध्ये पंजाबची पुनरावृत्ती होण्याचे संकेत मिळत आहेत. पंजाबमध्ये नवज्योतसिंग सिद्धू यांनी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांच्या विरोधात बंड पुकारले होते. मुख्यमंत्र्यांच्या विरोध असतानाही सिद्धू यांनी पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आले आहे. राजस्थानमध्येही पायलट यांनी मुख्यमंत्री गेहलोत यांच्या विरोधात बंड पुकारले होते. वर्षभरानंतर पायलट यांच्या मागण्यांवर कार्यवाही झालेली नसली तरी आता पक्ष त्यांच्या पारड्यात झुकते माप टाकण्याची शक्यता आहे. 

पायलट यांनी मंत्रिमंडळात समर्थक आमदारांना जास्त प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी लावून धरली होती. परंतु, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी याला विरोध केला होता. राजस्थानध्ये  मंत्रिमंडळात 30 पर्यंत मंत्री असू शकतात. सध्या मुख्यमंत्री गेहलोत यांच्यासह 21 मंत्री आहेत. सरकारमध्ये सध्या 9 मंत्रिपदे रिक्त आहेत. पायलट यांनी ही सर्व मंत्रिपदे समर्थकांसाठी मागितली आहेत. मात्र, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी याला नकार दिला आहे.

पायलट यांनी बंड केले त्यावेळी काँग्रेसला साथ देणाऱ्या अपक्ष व इतर आमदारांना डावलता येणार नाही, असे गेहलोत यांनी पक्ष नेतृत्वाला सांगितले आहे. हा आता वादाचा मुद्दा बनला आहे. मागील वर्षीही पक्षाच्या विरोधात बंड करुन पायलट आणि 18 आमदार दिल्लीत दाखल झाले होते. यामुळे राजस्थानमधील काँग्रेस सरकार संकटात आले होते. काँग्रेस नेतृत्वाने विविध मागण्यांवर कार्यवाही करण्याचा शब्द दिल्यानंतर पायलट यांच्यासह काँग्रेस आमदार पक्षात परतले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com