काँग्रेसमधील नेतृत्वाच्या वादावर ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले... - on congress leadership issue bjp leader jyotiraditya scindia says i am bjp worker | Politics Marathi News - Sarkarnama

काँग्रेसमधील नेतृत्वाच्या वादावर ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले...

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 ऑगस्ट 2020

काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक वादळी ठरली. त्यावरुन उठलेला वादंग मात्र, अद्याप शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. 

नवी दिल्ली : काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक अपेक्षेप्रमाणे वादळी ठरली. बैठकीतील इतर विषयांपेक्षा काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कथित विधानावरुन मोठा गदारोळ उडाला. कार्यकारी समितीच्या बैठकीत ठरल्यानुसार आता सोनिया गांधी याच पक्षाच्या अध्यक्षपदी कायम राहणार आहेत. पुढील सहा महिन्यांत नवीन अध्यक्षाची निवड केली जाणार आहे. यावर नागपूर दौऱ्यावर असलेले भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे यांना विचारले असता त्यांनी वेगळीच भूमिका घेतली आहे. 

काँग्रेस कार्यकारी समितीची अतिशय महत्वाची बैठक सोमवारी झाली. काँग्रेसच्या वीसहून अधिक ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष नेमावा, अशी मागणी केली होती. याचबरोबर त्यांनी पक्षातील रचनात्मक सुधारणांचा मुद्दा उपस्थित करुन पक्षाची स्थिती आणि दिशा याबाबत प्रश्न उपस्थित केले होते. याचबरोबर त्यांनी काँग्रेस कार्यकारी समितीची निवडणूक घेण्याची मागणी केली होती. 

पक्षातील नेतृत्व बदलाबाबत पत्र लिहिणारे नेते हे भाजपशी संगनमत करीत आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी या बैठकीत केल्याची चर्चा सुरू झाली होती. राजस्थानमध्ये पक्षासमोर निर्माण झालेले संकट, सोनिया गांधी रुग्णालयात दाखल असतानाची नेमकी वेळ पत्रासाठी निवडण्यात आली, असे राहुल गांधी म्हणाल्याचीही चर्चा होती. अखेर पक्षाने राहुल गांधी असे काहीच बोलले नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

कार्यकारी समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती काँग्रेस नेते के.एच. मुनियप्पा यांनी दिली. ते म्हणाले की. पक्षाच्या नेृत्वत्वाच्या मुद्द्यावरुन कोणतेही मतभेद नाहीत. गुलाम नबी आझाद, मुकूल वासनिक आणि आनंद शर्मा यांनी नेतृत्वाबाबत कोणतेही मतभेद नसल्याचे लेखी दिले आहे. सर्व सदस्यांनी सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शविला आहे. कार्यकारी समितीने एकमताने हा निर्णय घेतला आहे. 

सोनिया यांनी पक्षाचे नेतृत्व करावे, अशी विनंती राहुल गांधी यांनीही केली होती. अखेर सोनिया गांधी या हंगामी अध्यक्ष म्हणून राहण्यास संमती दर्शविली आहे. नवीन अध्यक्षांची निवड होईपर्यंत सोनिया गांधी या हंगामी अध्यक्ष असतील. पुढील सहा महिन्यांत पक्षाच्या नवीन अध्यक्षाची निवड होईल. यासाठी पुढील बैठक लवकरच बोलावण्यात येईल, असे कार्यकारी समितीचे सदस्य पी.एल. पुनिया यांनी सांगितले. 

काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेले खासदार ज्योतिरादित्य शिंदे हे नागपूर दौऱ्यावर आहेत. त्यांना काँग्रेसमधील नेतृत्वाच्या मुद्द्यावरुन उठलेल्या गदारोळाबद्दल विचारले असता काहीही प्रतिक्रिया न देण्याची भूमिका घेतली. ते म्हणाले की, हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. मी त्यावर प्रतिक्रिया देणार नाही. मी एक भाजप कार्यकर्ता आहे. यामुळे दुसऱ्या पक्षाच्या अंतर्गत मुद्द्यांवर बोलणे योग्य ठरणार नाही. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळिराम हेडगेवार यांचे निवासस्थान लोकांसाठी प्रेरणादायी आहे. देशाप्रती समर्पित असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांनी सुरू केला. देशासाठी सेवा करण्याची ऊर्जा या स्थानातून मिळते, असे शिंदे यांनी नमूद केले. 

ज्योतिरादित्य शिंदे यांनी 20 आमदारांना सोबत घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे मध्य प्रदेशातील काँग्रेसचे कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडले होते. तिथे पुन्हा भाजप सत्तेत येऊन शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्री बनले. त्यानंतर शिंदे यांना भाजपने राज्यसभा निवडणुकीत उभे केले होते. यात ते विजयी झाले होते.  

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख