काँग्रेसचे नेतृत्व बदला; शंभर नेत्यांचे सोनिया गांधींना पत्र - congress leaders wrote letters to sonia gandhi about change in leadership | Politics Marathi News - Sarkarnama

काँग्रेसचे नेतृत्व बदला; शंभर नेत्यांचे सोनिया गांधींना पत्र

वृत्तसंस्था
सोमवार, 17 ऑगस्ट 2020

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी यांना एक वर्षाहून अधिक काळ पूर्ण झाला आहे. पक्षात मागील काही काळात घडलेल्या घडामोडी पाहून आता पूर्णवेळ अध्यक्ष नेमण्याची मागणी जोर धरु लागली आहे. 
 

नवी दिल्ली : काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचा कार्यकाळाला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आहे.  त्यांचा एक वर्षाचा कार्यकाळ संपल्याने पक्षाचे अध्यक्षपद रिकामे राहणार की काय अशी चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती. यावर नवीन अध्यक्षांची निवड करण्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सोनिया गांधीच हंगामी अध्यक्ष राहतील, असे पक्षाने स्पष्ट केले होते. आता पक्षातील शंभर नेत्यांनी सोनिया गांधींना याबाबत पत्र पाठविले आहे.  

काँग्रेसचे निलंबित नेते संजय झा यांनी सोनिया गांधी यांना शंभर नेत्यांनी पत्र पाठविल्याचा दावा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, काँग्रेसच्या शंभर नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र पाठविले आहे. यात पक्षाचे नेतृत्व बदलण्यात यावा आणि काँग्रेस कार्यकारी समितीची निवडणूक पारदर्शी पद्धतीने राबवावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. पक्षातील एकंदरीस सर्व घडामोडी पाहून पक्षाचे नेते चिंतेत आहेत. 

काँग्रेसचे नेते शशि थरुर यांनी पक्षाने पूर्ण वेळ अध्यक्ष नेमण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी भूमिका घेतली होती. यावरुन काँग्रेसच्या अध्यक्षपदाची चर्चा सुरू झाली होती. त्यांनी म्हटले होते की, काँग्रेस पक्षाने तातडीने पूर्ण वेळ अध्यक्ष नेमण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. राहुल गांधी यांच्याकडे पुन्हा एकदा पक्षाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. परंतु, त्यांचीच पद स्वीकारण्याची इच्छा नसेल तर पक्षाने दुसरा पर्याय शोधालयला हवा. पक्षाला पुढील वाटचाल करण्यास पूर्ण वेळ अध्यक्षाची गरज आहे. 

सोनिया गांधी यांचा हंगामी अध्यक्षपदाचा कार्यकाळ 10 ऑगस्टला संपला आहे. त्यांनी हंगामी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली याला एक वर्ष पूर्ण झाले आहे. मुदत संपली असली तरी अध्यक्षपद आपोआप रिकामे होणार नाही. सोनिया गांधी या हंगामी अध्यक्षा आहेत. नवीन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्या पदावर राहतील. ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे मात्र, ती तातडीने पूर्ण होईल, अशी शक्यता नाही, असे पक्षाने याआधी स्पष्ट केले होते. 

काँग्रेस कार्यकारी समितीच्या माध्यमातून नवीन अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया राबवली जाईल. आगामी काळात लवकरच ही प्रक्रिया राबविण्याचा प्रयत्न असून, त्याचा निकाल सर्वांसमोर मांडण्यात येईल. याबाबतची प्रक्रिया काँग्रेसच्या घटनेत लिहिलेली आहे. पक्षाने तिचे पालन करणे बंधनकारक आहे. ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर याबाबतची माहिती सर्वांना दिली जाईल, असे पक्षाने म्हटले होते. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख