सोनिया की राहुल गांधी? नेतृत्व बदलाच्या मुद्द्यावरून काँग्रेसमध्ये दुफळी - congress leaders write to sonia gandhi about change in party leadership | Politics Marathi News - Sarkarnama

सोनिया की राहुल गांधी? नेतृत्व बदलाच्या मुद्द्यावरून काँग्रेसमध्ये दुफळी

वृत्तसंस्था
रविवार, 23 ऑगस्ट 2020

काँग्रेस पक्षात नेतृत्वाच्या मुद्द्यावरुन जोरदार मतभेद उफाळून आले आहेत. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे नाव पुन्हा पूर्णवेळ अध्यक्षपदासाठी घेतले जात आहे. 

नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये आता नेतृत्व बदलाच्या मुद्द्यावरुन दुफळी निर्माण झाली आहे. काही नेत्यांनी सोनिया गांधी याच अध्यक्षपदी हव्या आहेत तर काही नेत्यांनी राहुल गांधी यांचे नाव लावून धरले आहे. यातून पक्षात दोन गट पडले आहेत. काँग्रेस कार्यकारी समितीच्या उद्या(ता.२४) होणाऱ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडी घडत असून, उद्याची बैठक वादळी ठरण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, काही खासदार आणि माजी मंत्र्यांनी सामूहिक नेतृत्वाची मागणी केली आहे. 

पक्षाच्या 23 ज्येष्ठ नेत्यांनी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी संघटनात्मक रचनेत बदल  करण्यासोबत नव्या नेतृत्वाचा आग्रह धरला आहे. आम्ही सोनिया अथवा राहुल यांच्या नेतृत्वावर टीका केलेली नाही, केवळ बदलांचा आग्रह धरला असल्याचेही त्या नेत्याने सांगितले. हे पत्र या सर्व नेत्यांनी 7 ऑगस्टला सोनियांना लिहिल्याचे कळते. निवडणुकीतील पराभवानंतर त्यावर पक्षांतर्गत विचारमंथन झाले नाही. पक्षाचे नेतृत्वही जबाबदारी घेताना दिसत नाही, अशी खंतही पत्रात व्यक्त केली आहे 

दुसरीकडे राहुल गांधी यांच्या निकटवर्ती नेत्यांनी काँग्रेस कार्यकारी समितीला पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी पक्षाची धुरा ही पुन्हा राहुल यांच्याकडेच सोपवावी, अशी मागणी केली आहे. या गटाने पुन्हा राहुल यांनाच पक्षाचे अध्यक्ष केले जावे म्हणून आग्रह धरला आहे, विद्यमान खासदार मणिक्कम टागोर यांनी पुन्हा राहुल यांनाच पक्षाचे अध्यक्ष केले जावे, अशी आग्रही मागणी केली आहे. टागोर यांच्याप्रमाणेच छल्ला वामशी रेड्डी, तेलंगणमधील काही माजी आमदार आणि महाराष्ट्राच्या प्रदेश सचिवांनी राहुल यांनाच अध्यक्ष केले जावे अशी मागणी केली आहे. यामुळे उद्या होणारी कार्यकारी समितीची बैठक वादळी ठरणार आहे. 

नेतृत्वबदलाच्या पत्रावर स्वाक्षरी करणारे नेते  
नेतृत्वबदलासाठी सोनिया गांधी यांना पत्र लिहिणाऱ्या नेत्यांमध्ये राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद, उपनेते आनंद शर्मा, माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुडा, पृथ्वीराज चव्हाण, राजिंदरकौर भट्टल, माजी मंत्री मुकूल वासनिक, कपिल सिब्बल, एम. वीरप्पा मोईली, शशी थरूर, मनिष तिवारी तसेच, माजी खासदार मिलिंद देवरा, जितीन प्रसाद आणि संदीप दिक्षित यांचा समावेश आहे. याशिवाय राज बब्बर, अरविंदसिंग लव्हली, कौलसिंह ठाकूर, अखिलेशप्रसाद सिंह आणि कुलदीप शर्मा या प्रदेशाध्यक्षांनीही बदलांची मागणी केली आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख